
दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर आता भारतीय जनता पक्षातीलच नेते प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील परिस्थितीवर टीका करत, “दिल्लीतील लोकांचा श्वास घुसमटतो, तर उत्तर प्रदेशातील हवा स्वच्छ आहे,” असे म्हटले आहे.
दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) अनेक महिन्यांपासून खराब पातळीवर कायम आहे. रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दिल्लीचा AQI 142 नोंदवण्यात आला, जो आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. AQI 0 ते 50 दरम्यान असल्यास हवा चांगली मानली जाते, 50 ते 100 दरम्यान मध्यम, तर 100 ते 150 दरम्यानची पातळी खराब समजली जाते. दिल्लीमध्ये हवा मध्यम किंवा चांगल्या दर्जाची असण्याची स्थिती अत्यंत क्वचित दिसते.
दरम्यान, वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सत्तेत कोणताही पक्ष असो, वाढत्या प्रदूषणामुळे तो नेहमीच टीकेचा धनी ठरला आहे. आम आदमी पक्षाची सत्ता असताना अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. आता विरोधी पक्ष खराब हवेच्या मुद्द्यावरून भाजपला घेरत आहेत.
गोरखपूरमधील एका सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “दिल्लीतील जीवन घुसमटल्यासारखे झाले आहे. ती गॅस चेंबरसारखी वाटते. AQI 400 च्या वर गेला की श्वास घेणे कठीण होते. मुलांना आणि वृद्धांना घराबाहेर पडू नका, असे सांगावे लागते. परिस्थिती अत्यंत खराब असते. गोरखपूरमध्ये मात्र वातावरण उत्तम आहे, कोणतीही अडचण नाही.”
या सभेत त्यांनी नागरिकांना रस्त्यांवरील स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहनही केले. स्वच्छता आणि शुद्धतेकडे लक्ष देणे ही जनतेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
























































