
ही भस्मासुर आणि बकासुराची अवलाद आहे. या भस्मासुरांनी महाराष्ट्र लुटला. त्यामुळे राज्य 10 वर्ष मागे गेले. यांची जागा जेलमध्ये आहे, अशी तोफ डागत माझे मन आणि हातही साफ आहेत. त्यामुळे माझ्या नादाला लागलात तर तुमची एकही महापालिका ठाणे आणि पालघर जिह्यात येऊ देणार नाही. तुमची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे ओपन चॅलेंज वन मंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
वाशी येथील एका विशेष कार्यक्रमात वन मंत्री गणेश नाईक यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत नाईक यांनी पुन्हा एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा क्षेत्राचे खासदार नरेश म्हस्के यांना थेट टार्गेट केले. आमचे नवी मुंबईत असलेले राजकीस अस्तित्व संपण्याचा घाट शिंदे गटाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घातला होता. निवडणुकीपूर्वी एक वर्ष आगोदरपासून मोठमोठी मातब्बर माणसे फोडण्याचा सपाटा लावला होता. पण नवी मुंबईतील जनतेने पालिका निवडणुकीत त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार केले. माझे हातपण साफ आहेत आणि मनपण साफ आहे. ही मंडळी भस्मासुर आणि बकासुर आहेत. यांच्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे गणेश नाईक म्हणाले.
वन विभागाची जागा जाऊ देणार नाही
माझे मन आणि हात साफ आहेत. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. यांनी गोरगरीबांच्या जमिनी हडप केल्या आणि बिल्डरांना दिल्या. वन विभागाची जमीन हडप करण्याचा घाटही त्यांनी घातला होता. मात्र मी वन मंत्री आहे तोपर्यंत वन विभागाची एकही इंच जमीन या भस्मासुर आणि बकासुराच्या घशात जाऊ देणार नाही, असाही इशारा गणेश नाईक यांनी यावेळी दिला.
14 गावांचा प्रस्ताव मी आणला
कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्याचा ठराव माझ्याच मार्गदर्शनाखाली महापौरांनी आणला होता. तो महासभेतही मंजूर झाला. ही गावे समाविष्ट करताना 500 कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा, सुमारे 400 एकरवर असलेली भंगाराची गोडाऊन काढून टाकावीत, पारसी डोंगरमध्ये बोगदा तयार करण्यात यावा, अशा मागण्या केल्या होत्या. मात्र या गावांचा नवी मुंबईत समावेश करताना आपल्याला विचारात घेतले नाही. एकनाथ शिंदे यांनी परस्पर निर्णय घेतला, असेही गणेश नाईक या वेळी म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांचे नाईक यांना आव्हान
गणेश नाईक यांना जास्त खुमखुमी आली असेल तर त्यांनी कल्याण ग्रामीण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी, असे प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती नाराजी
कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा समोवश नवी मुंबई महापालिकेत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी परस्पर निर्णय घेतल्यानंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी तूर्तास थांबण्यास सांगितले होते. या गावांसाठी शासनाने ठरल्याप्रमाणे निधी द्यावा, ही मागणी भाजपची आजही आहे. या गावांतील जनतेने आता भाजपचेच नगरसेवक निवडून दिले आहेत. तरीपण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असेही गणेश नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले.
तुमच्या पुत्राला नावापुढे माजी खासदार लिहावे लागेल
शिंदे गटाने माझ्या नादाला लागू नये. मला जर भाजपने परवानगी दिली तर तुमचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नावापुढे माजी खासदार लिहावे लागेल. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के हे आता खासदार आहेत. मी मनात आणले तर त्यांना पुन्हा आयुष्यात कधी खासदार होता येणार नाही. आयुष्यभर माजी म्हणूनच राहतील, असे फटकारे गणेश नाईक यांनी या वेळी लगावले.
यांनी निवडणुकीत वाटलेला पैसा हा पापाचा आहे. ही सर्व पापे जर उघड झाली तर ही सर्वच मंडळी जेलमध्ये जाईल आणि लवकर बाहेरही पडणार नाहीत. यांच्या सर्व कारनाम्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. – गणेश नाईक
































































