विंडीजचा सुपर हिट विजय, विजयाच्या हॅट्ट्रिकसह विंडीज सुपर एटमध्ये, तर नेपाळचा गेम ओव्हर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजने आपल्या वेगवान खेळाच्या जोरावर आधी नेपाळचा डाव 133 धावांवर रोखला आणि मग विजयी लक्ष्य 27 चेंडू राखून गाठत आपल्या विजयाची हॅटट्रिकच नव्हे सुपर हिट विजयाची हॅटट्रिक साजरी केली. तसेच सलग तीन विजयांसह ‘क’ गटातून टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एटमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला. दुसरीकडे पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की झेलणारा साखळीत बाद होणारा पहिला संघ ठरला. नेपाळच्या चार आघाडीवीरांना बाद करणारा जेसन होल्डर ‘सामनावीर’ ठरला.

आजही वानखेडेवर नेपाळचे चाहते मोठय़ा संख्येने हजर होते, पण नेपाळी चाहत्यांची त्यांच्या संघाने घोर निराशा केली. प्रथम फलंदाजी करणारा नेपाळ 20 षटकांत फलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे 133 धावाच करू शकला. इथेच जेसन होल्डरने सामना विंडीजच्या झोळीत टाकला होता. त्यानंतर नेपाळकडून मिळालेल्या 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 16 व्या षटकांतच पूर्ण केला. विंडीजने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत नेपाळला कोणती संधी दिली नाही. ब्रॅण्डन किंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला असला तरी दोन्ही सलामीवीरांनी धोका न पत्करता सातत्याने धावा केल्या.

पॉवर प्लेमध्ये 44 धावांची भागीदारी उभारल्यानंतर किंग 22 धावांवर बाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर कर्णधार शाय होप (नाबाद 61) व आलेला शिमरॉन हेटमायर (नाबाद 46) यांनी नेपाळच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. 15 व्या षटकात होपने सलग षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 59 चेंडूंत 91 धावांची अभेद्य भागीदारी करीत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नेपाळकडून नंदन यादवने एकमेव विकेट घेतली.

दीपेंद्र सिंग ऐरीचे अर्धशतक

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना नेपाळला सुरुवातीपासूनच गती मिळाली नाही. सलामीवीर पुशल भुर्तेल (1) पहिल्याच षटकात बाद झाला, तर कर्णधार रोहित पौडेल केवळ 5 धावांवर पायचीत झाला. सातव्या षटकापर्यंत नेपाळची अवस्था 4 बाद 23 अशी बिकट झाली होती. या संकटात दीपेंद्र सिंग ऐरीने (58) खालच्या फळीतील फलंदाजांच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लोकेश बाम (13) आणि गुलशन झा (11) यांच्यासोबत त्याने संथगतीने का होईना, पण महत्त्वाच्या भागीदाऱया उभारल्या. शेवटच्या तीन षटकांत 44 धावा जमवत नेपाळने 20 षटकांत 8 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. होल्डरने 27 धावांत 4 फलंदाज बाद केले, तर अकिल होसैन, मॅथ्यू फोर्ड, शामर जोसेफ व रोस्टन चेस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.