अमेरिकाही सुपर एटच्या शर्यतीत, सलग दुसऱ्या विजयासह आव्हान राखले कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार मोनांक पटेल आणि संजय पृष्णमूर्ती यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अमेरिकेने नामिबियावर 31 धावांनी विजय मिळवित टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ‘अ’ गटातून सुपर-8 मधील आपले आव्हान जिवंत राखले आहे. स्पर्धेत अद्यापि विजयाची पाटी कोरी असलेल्या नामिबियाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. अमेरिकेच्या विजयामुळे त्यांचे सुपर एटचे भवितव्य हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.

चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या लढतीत अमेरिकेकडून मिळालेल्या 200 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला 6 बाद 168 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. लॉरेन स्टीनकॅम्पने 33 चेंडूंत अर्धशतक झळकावत नामिबियाला स्पर्धेत ठेवण्याचा प्रयत्न केला. अली खानच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याने आक्रमक सुरुवात केली. जान फ्रायलिंक (19) याच्यासोबत 32 चेंडूंत 54 धावांची सलामी भागीदारी झाली, मात्र आवश्यक धावगती वाढत असताना नामिबियाला शेवटच्या टप्प्यात मोठे फटके मारता आले नाहीत. स्टीनकॅम्पने 58 धावांची आपली सर्वोच्च टी-20 धावसंख्या नोंदवली, परंतु शुभम रंजनने त्याला बाद करत नामिबियाला धक्का दिला. कर्णधार गेरहार्ड इरासमसही (6) स्वस्तात बाद झाला. जॅन निकोल लॉफी-ईटन (28) व जेजे स्मित (31) यांनीही नामिबियाला सावरण्याचे प्रयत्न केले. मात्र ते अपुरे ठरले.

पटेल, कृष्णमूर्ती यांची अर्धशतके

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 4 बाद 199 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मोनांक पटेलने (52) सुरुवातीलाच मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत केवळ 27 चेंडूंत अर्धशतक झळकावत पॉवर प्लेमध्ये संघाची भक्कम पायाभरणी केली. संजय कृष्णमूर्ती (नाबाद 68) आणि मिलिंद पुमार (28) यांच्या 47 चेंडूंत 87 धावांच्या भागीदारीने अमेरिकेच्या धावगतीला वेग दिला. कृष्णमूर्तीने आपल्या पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतकात 33 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या टप्प्यात पृष्णमूर्तीने बर्नार्ड शॉल्ट्झ आणि ट्रम्पेलमन यांच्यावर हल्ला चढवत 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एका षटकात 26 धावा काढत त्याने सामन्याचे पारडे निर्णायकपणे अमेरिकेकडे झुकवले. अमेरिकेने अखेरच्या सहा षटकांत तब्बल 83 धावा जोडत नामिबियाच्या गोलंदाजीचा समाचार घेतला आणि धावसंख्या 200 च्या उंबरठय़ाजवळ नेली.