
किरकोळ भांडणातून तरुणाची हत्या करून पलायन केलेल्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक केली आणि हत्येच्या गंभीर गुन्ह्याची वेळीच उकल केली.
आरोपी रोहित खरात मोटरसायकलवरून पळून गेला होता. त्याने तत्काळ मोबाईल बंद ठेवल्यामुळे तपासात आव्हान उभे ठाकले होते. मात्र कांजूरमार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी शोध घेत आरोपीला अखेर जालना जिह्यातील बदनापूर येथून ताब्यात घेतले.
26 वर्षीय रोहित खरातने हर्ष ठाकूर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-7 चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, भांडुप विभागाचे सपोआ मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी कांजूरमार्ग, पंतनगर, नवघर, विक्रोळी, पार्कसाईट, घाटकोपर पोलीस ठाण्यातील पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. शोध मोहिमेदरम्यान कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या विशेष पथकातील डिओ पोउपनि ओमासे, सपोनि दाभाडे, शेलार, अनासरे यांनी आरोपीला जालन्यातून ताब्यात घेतले.त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांची विशेष मेहनत
गुह्याची उकल करण्यासाठी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील तपासिक अंमलदार पोनि (प्रशासन) अमोल कड्डु, विष्णू आव्हाड, गणेश्वर शेटे, सपोनि पाडुळे, मिथुन पाटील, राजपुत, किशोर चव्हाण, हसे, एटीसी पथक, बिट मार्शल, यांनी विशेष मेहनत घेतली. तपासात पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (कावसु), अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त भांडुप विभाग यांचे मार्गदर्शन लाभले.
सीसीटीव्ही फुटेजसह खबऱयांची मदत
कांजूरमार्ग पोलिसांनी सलग 30 तास तपास केला आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतानाच खबऱयांची मदत घेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध मोहीम तीव्र केली. आरोपीच्या मित्र-नातेवाईकांकडे विचारपूस करीत पोलिसांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला आणि स्वतःची राहण्याची ठिकाणे लपवत फिरणाऱया आरोपीला 36 तासांच्या आत अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































