
राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना आखणाऱया अल्पसंख्याक विकास विभागात सध्या प्रशासकीय अनागोंदी माजली आहे. विभागातील ठराविक अधिकाऱयांच्या मनमानीमुळे कर्मचारी हैराण झाले असून त्याचा फटका विभागात नव्याने बदली होऊन आलेल्या सहसचिवाला बसला आहे. सहसचिवांकडील कार्यासनांना कात्री लावण्याचा खटाटोप केलेल्या एका कक्ष अधिकाऱयाच्या विरोधात संबंधित सहसचिवाने थेट विभागाच्या सचिवांकडे तक्रार करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सहसचिव मनोज जाधव यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काwशल्य विकास विभागातून अल्पसंख्याक विकास विभागात बदली करण्यात आली. विभागात रुजू झाल्यानंतर जाधव यांना सहसचिवांकडून हाताळल्या जाणाऱया कार्यासनांची जबाबदारी दिली जाणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात सहसचिवांकडील कार्यासने कमी करून ती उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्याकडे देण्यात आली. विभागातील आस्थापना शाखेचे कक्ष अधिकारी प्र. दा. अंधारे यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी कार्यासनांच्या वाटपाबाबत कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सहसचिव जाधव यांच्याकडे कार्यासन 3, 6 आणि 7 तर उपसचिव शेनॉय यांच्याकडे कार्यासन 1, 2, 4, 5, 8 आणि 9 सोपवण्यात आले आहेत. सहसचिवांपेक्षा उपसचिवांकडे अधिकची आणि महत्त्वाची कार्यासने देण्यात आल्याने विभागात आश्चर्य व्यक्त होत आहे.
यापूर्वीच्या सहसचिवांचा कार्यभार आणि वरिष्ठ पदानुसार कार्यासने सोपवण्यात न आल्याने जाधव यांनी विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांच्याकडे अंधारेंविरोधात तक्रार केली आहे. कार्यासने वाटपाचा कार्यालयीन आदेश हा 18 डिसेंबर 2025 रोजीचा आहे. मात्र, या दिवशी अंधारे कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे त्यांना असा आदेश काढण्याचा कोणताही अधिकार नाही. आस्थापनेचे अवर सचिव, उपसचिव हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना त्या दिवशी गैरहजर असलेला अधिकारी कार्यालयीन आदेश कसा काय काढू शकतो, असा सवाल जाधव यांनी तक्रार अर्जात केला आहे. याप्रकरणी अंधारे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सहसचिव पदाची कार्यासने सोपवावीत, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. जाधव यांच्या या मागणीनंतर त्यांना आणखी एक कार्यासन देण्यात आले आहे.
अल्पसंख्याक विकास विभागात सहसचिव आणि उपसचिव ही दोन्ही पदे समकक्ष आहेत. सहसचिव अलीकडेच बदली होऊन विभागात रुजू झाले आहेत. त्यांना विभागाचा अनुभव नसल्याने सध्या कमी कार्यासने दिली आहेत.
रुचेश जयवंशी, सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग
























































