
गायमुख घाटात रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक मल्टी एक्सल ट्रक गायमुख घाटातून ठाण्याकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने धडक देत तब्बल १२ वाहनांना चिरडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान एक रिक्षाचालक किरकोळ जखमी असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ट्रकचालक फरार आहे.
ठाण्याच्या गायमुख घाटातून ठाण्याकडे येणाऱ्या तीव्र उतारावर रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. ठाणे वाहिनीवरील गायमुख चौकीसमोर एक मल्टी एक्सल ट्रकचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रकचालकाने घोडबंदर – ठाणे वाहिनीवरून जाणाऱ्या तब्बल १२ गाड्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोन रिक्षा तर १० चारचाकी असून या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुमारे ४० ते ५० टन माल वाहून नेणाऱ्या या कंटेनरने उतरणीवर नियंत्रण गमावल्याने वाहनांना जोरदार धडक दिली.
रिक्षाचालकाची ओळख पटलेली नाही
१२ वाहनांना धडक देऊन ट्रकचालक वाहन रस्त्यावर सोडून पळून गेला. अपघातात एक रिक्षाचालक किरकोळ जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त रिक्षाचालकाची ओळख पटलेली नाही. अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढून घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.



























































