
ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर खेळाडूंना रोखण्यासाठी चक्क कुत्र्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. हे मैदान बळकावण्यासाठी स्पोर्टिंग क्लबने कुंपण घालून गेट लावले आहे. इतकेच नाही तर एखाद्या खेळाडूने आतमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कुत्रे सोडले जातात, असा आरोप खेळाडूंनी केला असून स्पोर्टिंग क्लबच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. एकीकडे राजकीय सभांसाठी हे मैदान बंद केले असताना आता खेळाडूंनाच मज्जाव केला जात असल्याने ठाण्यात नेमकं चाललंय काय, असा सवाल केला जात आहे.
ठाणे शहरात एकमेव असे मोठे खेळाचे मैदान म्हणून सेंट्रल मैदान ओळखले जाते. हे मैदान शासनाच्या मालकीचे असून या मैदानाचा उपयोग सर्वसामान्य खेळाडूंना झाला पाहिजे असा उद्देश आहे. मात्र अलीकडच्या काळात स्पोर्टिंग क्लब यांची या मैदानावर मनमानी वाढली असल्याचा आरोप खेळाडू आणि नागरिकांनी केला आहे. क्लबच्या वतीने दुतर्फा नेट बांधून व्यावसायिक स्वरूपात सिझन क्रिकेट देण्यात येत आहे. दरम्यान सिझन बॉलच्या फटकेबाजीमुळे इतर खेळाडूंना गंभीर दुखापत झालेली आहे. शिवाय पादचारी, फुटपाथवरून नागरिक, महिला आणि वृद्धांना भीतीच्या सावटात वावर करावा लागत आहे. सेंट्रल मैदानात इतर मुलांना व खेळाडूंना खेळण्यापासून रोखण्याचे प्रकार वाढले असून पिण्याच्या पाण्याच्या सुविधांपासून खेळाडूंना मनाई केली जात आहे. तसेच शौचालय वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या मैदानावर महिला, पुरुष खेळाडूंना रोखण्यासाठी हिंसक कुत्र्यांचा वापर करून दहशत निर्माण केल्याचा गंभीर आरोप खेळाडूंनी केला असून यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
बेकायदेशीर पद्धतीने मैदान ताब्यात घेतल्याचा आरोप
ठाणे येथील ऐतिहासिक सेंट्रल मैदान हे एकेकाळी राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमाला प्रसिद्ध होते. या मैदानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी सेंट्रल मैदान गाजवले आहे. मात्र न्यायालयाने या मैदानावर राजकीय सभा, कार्यक्रम घेण्यास मनाई केली. त्यानंतर हे मैदान सर्वसामान्य खेळाडूंना उपलब्ध झाले. मात्र आता स्पोर्टिंग क्लबकडून बेकायदेशीर पद्धतीने मैदान ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

























































