
लोकलमधील वाढती गर्दी आता प्रवाशांच्या जीवावर उठू लागली आहे. रेटारेटी, भांडणे यामुळे गर्दीचा प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. लेडीज डब्यात चढण्यावरून दोन महिलांमध्ये जबरदस्त राडा झाल्याची संतापजनक घटना कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर घडली आहे. एका महिला प्रवाशाने दुसरीच्या हाताचा चावा घेतला आणि तिचे बोटही पिरगळले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून रेल्वे पोलीस चावा घेणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत. दरम्यान लोकलमधील या गर्दीचे करायचे काय, असा एकच सवाल विचारण्यात येत आहे.
कल्याण, डोंबिवली आणि ठाणे ही तीन स्थानके प्रवाशांनी सकाळी व संध्याकाळी खचाखच भरलेली असतात. कामावर लेटमार्क लागू नये म्हणून प्रचंड गर्दीतून महिलांनाही जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागतो. गेल्या काही दिवसांत रेल्वेतील गर्दीमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीतील सोहम कठरे हा कळव्याला परीक्षा देण्यासाठी जात असताना मुंब्रा ते कळवादरम्यान लोकल च्या गर्दीमधून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. शनिवारी ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी वणवा भडकल्याने कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
शाब्दिक वाद आणि हाणामारी
मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यात चढताना प्रियांका थोरात यांना गाडीतील एका महिलेने मज्जाव केला. दोघींमध्ये झटापट झाली. एका अज्ञात महिलेने थोरात यांच्या त्यांचे बोटही महिला स्वतःही नीट उतरत नव्हती आणि प्रियांका यांनाही द्रवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
तरीही ती कामावर गेलीच
लेडीज डब्यातील महिलेने प्रियांका थोरात यांच्या हाताचा चावा घेतला, बोट पिरगळले. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. अशाही परिस्थितीत त्या लोकलमध्ये चढल्या व पुढील प्रवास करत कामावरही गेल्या. संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर जास्तच त्रास होऊ लागल्याने त्या डॉक्टरकडे गेल्या. त्यावेळी दुखापत झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या आधारे हाताला चावा घेणाऱ्या महिलेचा शोध सुरू करण्यात आला आहे.



























































