बेंगळुरू: बँकेच्या डेप्युटी मॅनेजरचा प्रताप! ग्राहकांचे ३.५ कोटींचे सोने जुगारात उडवले; असा उघड झाला प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका राष्ट्रीयकृत बँकेच्या उपव्यवस्थापकाने (डेप्युटी मॅनेजर) ग्राहकांच्या विश्वासाला तडा देत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. आरोपीने ग्राहकांचे सुमारे ३.५ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परस्पर गहाण ठेवून मिळालेले पैसे ऑनलाइन जुगारात (Online Betting) उडवल्याचा आरोप आहे.

बेंगळुरूच्या गिरीनगर पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारी रोजी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उपव्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमध्ये असलेले ग्राहकांचे तब्बल २,७८० ग्रॅम (सुमारे २.७ किलो) सोन्याचे दागिने वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता चोरले. त्यानंतर हे दागिने त्याने एका फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलले.

तपासात धक्कादायक खुलासे

पोलीस तपासात असे समोर आले आहे की, या गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आरोपीने ऑनलाइन सट्टा आणि जुगारासाठी वापरली होती. दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त (DCP) लोकेश बी. जगलासर यांनी सांगितले की, ‘आरोपीला अटक करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात यश आले आहे. उर्वरित दागिने हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’

बँका आणि फायनान्स कंपन्यांवर पोलिसांची नजर

तपासादरम्यान ज्या फायनान्स कंपन्यांकडे हे सोने गहाण ठेवले होते, त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘आम्ही याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून संबंधित वित्त कंपन्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे डीसीपींनी स्पष्ट केले. तसेच, नागरिकांनी आपल्या बँक लॉकरमधील दागिन्यांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी खात्री करावी, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.

Bengaluru Bank Fraud: Deputy Manager Uses Rs 3.5 Cr Customer Gold for Gambling

A deputy bank manager in Bengaluru was arrested for allegedly misappropriating 2.78 kg of customers’ gold worth Rs 3.5 crore to fund online betting habits. Read more about this shocking bank fraud.