
ठाणे, नवी मुंबईतील भ्रष्टाचार, अरेरावीविरुद्ध मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात रान उठवले आहे. यावरून शाब्दिक चकमक सुरू असताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांना थेट आपल्याविरोधात निवडणूक लढण्याचे आव्हानही दिले होते. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून गणेश नाईक यांना स्वगृही येण्याचे आवाहन केले.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे. भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा आहे. भाजपबरोबर राहून तुमची ही लढाई टोकाला जाणार नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत यावे आणि या लढाईचे रणशिंग फुंकावे. विजय गणेश नाईक यांचाच होईल.
गणेश नाईक यांनी त्यांच्या जिल्ह्यात भ्रष्टाचार, अरेरावीविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात गेले. रस्ते, बगिच्यांसाठी राखीव ठेवलेले भूखंड बिल्डरांना दिले, यात कसा भ्रष्टाचार झाला हे गणेश नाईक यांनी सांगितले. तसेच एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे स्वत: गणेश नाईक म्हणतात. पण त्यांना सरकारचे पाठबळ मिळते का? नाही. ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.
माझ्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवेन! गणेश नाईक यांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
गणेश नाईक यांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे, असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे गणेश नाईक यांना पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील मंत्र्यावर पोरकट हल्ले करताहेत, म्हणून माझे गणेश नाईक यांना आवाहन आहे, ही लढाई तुम्हाला भाजपमध्ये राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही.
तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवले आहे. तुम्ही स्वगृही आले पाहिजे, मूळ प्रवाहात आले पाहिजे आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे. संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. भाजप बरोबर राहून तुम्ही लढणार नाहीत, तुम्हाला फार करत आमदारकी, मंत्रीपद मिळतील, लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही, असे संजय राऊत ठामपणे म्हणाले.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुख पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून आश्वसनांची पूर्तता झाली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत जगदाळे यांच्या कुटुंबाने अमित शहांची भेट घेत महाराष्ट्र सरकारला निर्देश देण्याचे विनंती केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा कुटुंबावर आघात झाला. प्रत्येकाच्या घरी भाजपचे लटांबर जाऊन, छाती पिटून ‘राजकीय आक्रोश’ करताना आम्ही पाहिले आहे. मदत करू, नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले, पण भाजपचा खोटारडेपणा अशा प्रसंगातही दिसतो. ज्या कुटुंबाने आपला माणूस गमावला आहे त्यांच्यासाठी सरकार काही करू शकत नसेल तर कसले हिंदूत्व आणि कसला राष्ट्रवाद, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.























































