महायुती सरकारचे आश्वासन हवेतच, पहलगाम हल्ल्याच्या दहा महिन्यानंतरही संतोष जगदाळेंच्या मुलीला सरकारी नोकरी नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहलगाममध्ये एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महायुती सरकारने जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पहलगाम हल्ल्याला दहा महिने होऊनही अद्याप आसावरी यांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे येथील रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री यासाठी अनुकूल होते. तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते. आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना पुरेसा अनुभव देखील आहे. त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला होता. परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाही. घरातील कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी. पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबांबाबत एवढी संवेदनशीलता तरी हे सरकार नक्कीच दाखवू शकते.

पहलगाम हल्ला झाल्यानंतर सात दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत, मोफत शिक्षण आणि एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र या घटनेला दहा महिने झाले तरी अद्याप मृतांच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळाल्या नसल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत आम्ही घरातला जो खर्च करतोय तो माझ्या सेव्हिंगमधून करतेय पण आता मला नोकरीची खरंच गरज आहे. आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे आसावरी यांनी सांगितले.

मी माझ्या मुलीच्या नोकरी साठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी बोलले. प्रत्येकाने माझ्याकडे फाईल नाही असे सांगितले. महाराष्ट्र सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी माझ्या मुलीला सरकारी सेवेत रुजू करून घ्यावे, असे जगदाळे यांच्या पत्नीने म्हटले आहे.