
परभणी महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदाचा, तर काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांनी उपमहापौरपदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सय्यद इकबाल सय्यद खाजा म्हणाले की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने शिवसेना नेहमीच सर्व धर्मीय, सर्व जाती-जमातींना एकत्र आणून समाजहित, राष्ट्रहिताचे कार्य करत आली आहे आणि पुढेही अखंडपणे करत राहील. त्यानुसारच मुस्लिम समाजातील एका उच्चशिक्षित, निष्ठावान आणि राष्ट्रभक्त कार्यकर्त्याला महापौरपदाची संधी आपण दिली.”
ते म्हणाले, मात्र यामुळे काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. राज्यभरात नाहक चर्चा आणि टीका होत आहे. पण बाळासाहेबांची शिकवण स्पष्ट आहे, जो राष्ट्रावर प्रेम करतो, तो कोणत्याही समाजातील, धर्मातील असला तरी कट्टर देशभक्त आहे! याच विचारसरणीतून आम्ही सय्यद इकबाल यांसारख्या समर्पित व्यक्तीला ही जबाबदारी सोपवली आहे. हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर शहरातील सामाजिक सलोखा, एकता आणि समरसता कायम राखण्यासाठी घेतला आहे. आता कुठल्याही टिप्पणीकडे लक्ष न देता परभणीच्या जनतेने आम्हाला दिलेल्या विश्वासाला साजेशी कामगिरी करायची आहे. पुढील ५ वर्षांत शहराला अभूतपूर्व विकास देणार आहोत.


























































