
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची एक तऱ्हा तर विधानसभा अध्यक्ष राहुल‘भाई’ नार्वेकरांची दुसरी तऱ्हा. ‘भाई’ नार्वेकर यांनी तर कमाल केली! संविधानिक जबाबदाऱ्या व किमान शिष्टाचाराची ऐशी की तैशी करून नार्वेकर हे एका शेतकऱ्याच्या जागेत घुसले व सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन त्या जागेची मोजणी करू लागले. तेव्हा ते शेतकरी कुटुंब चवताळून समोर आले व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना पळता भुई थोडी झाली हे एका व्हिडीओत स्पष्ट दिसते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे, असे हे झिरवळ-नार्वेकर प्रकरण आहे. मंत्रालयात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महाराष्ट्राच्या इज्जतीचे ‘वस्त्रहरण’ सुरू आहे, पण चिंता कुणाला?
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा एक सरस अशी रत्नं भरलेली आहेत. या रत्नांच्या खाणीचे नेमके करायचे काय? असा प्रश्न फडणवीस यांना पडला असेल. नरहरी झिरवळ व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या रत्नांचे जे तेजस्वी प्रताप समोर आले आहेत ते थक्क करणारे आहेत. झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्षदेखील होते. त्या पदावर असतानाही त्यांनी केलेले उद्योग हादेखील चर्चेचा विषय होता. मंत्रालय हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे, पण चोरी पकडली जात नाही तोपर्यंत सगळेच साव असतात. झिरवळ हे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. लोकांच्या जिवाशी संबंधित हे खाते आहे. त्यामुळे या खात्याचा मंत्री अनुभवी व वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान असलेला असणे गरजेचे आहे, पण सध्या काळ असा आहे की, कुणालाही कुठेही चिकटवले जाते. तसे झिरवळांना अन्न-औषध खात्यात चिकटवण्यात आले. झिरवळ यांची भूक मोठी आहे. ती भूक भागवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागावर जबाबदारी पडली. अन्नधान्यातील भेसळ तपासणे, हॉटेलमध्ये शुद्ध, स्वच्छ अन्न मिळते की नाही ते पाहणे, तंबाखू, गुटखा यावर बंधने ठेवणे, औषधे, त्यांच्या दुकानांवर नियंत्रण ठेवणे. विशेषतः भेसळयुक्त औषधांचा शोध घेऊन बनावट औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर धाडी वगैरे घालणे अशी कामे हे खाते करते, पण याच खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे हे तितकेच खरे. झिरवळ यांच्या कार्यालयातील एक लिपिक राजेंद्र ढेरंगे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंत्र्याच्या दालनातच पोलीस घुसले व त्यांनी मंत्र्याच्या लिपिकाला पकडले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेशिवाय अशी कारवाई होऊच शकत नाही. या कारवाईचा अर्थ असा की, अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील
भ्रष्टाचाराच्या कहाण्या
मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्या व हे जरा अतीच झाले म्हणून झिरवळांची हिरवळ श्री. फडणवीस यांनी उखडून टाकली. ढेरंगेच्या अटकेनंतर झिरवळांनी ‘काखा’ वर केल्या, पण तपासात असे समोर आले की, झिरवळांचे पीए रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून ढेरंगेने मंत्र्यांच्या दालनात लाच स्वीकारली व हा गुंता मंत्री झिरवळ यांच्यापर्यंत पोहोचला. आता गेल्या पाच-सहा दिवसांपासून झिरवळ गायब झाले, त्यांचा फोन बंद. हे एक रहस्यच म्हणावे लागेल. पोलीस तपास आपल्यापर्यंत पोहोचेल या भीतीने झिरवळ गायब झाले असतील तर मंत्री फरार झाले आहेत असे गृहमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे. मंत्र्याच्या दालनात पोलिसांनी सापळा लावला व कारवाई केली हे साधे प्रकरण नाही. केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणतात, ‘‘मंत्रालयात हा अशा प्रकारे भ्रष्टाचार माजला आहे. आता फक्त लाचेची ‘रेट लिस्ट’ लावणेच बाकी आहे. पीएचा सहभाग असलेल्या प्रकरणाची माहिती मंत्र्यांना नसावी हे शक्यच नाही. या भ्रष्टाचारास मुख्यमंत्रीही तितकेच जबाबदार आहेत.’’ नावंदर यांनी सत्य तेच सांगितले. भ्रष्टाचारात व दगाबाजीत महाराष्ट्र अव्वल झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंतवणूक ही भ्रष्टाचारात झाली आहे. मुंढवा जमीन प्रकरणात मोठ्या घरच्या मुलांना मुख्यमंत्र्यांनी वाचवले व आता झिरवळांच्या हिरवळीवरही फडणवीस मायेने हात फिरवतील. कारवाया करून मंत्र्याच्या शेंड्या आपल्या हातात ठेवायचे हे धंदे आता तरी बंद झाले पाहिजेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची एक तऱ्हा तर विधानसभा अध्यक्ष राहुल‘भाई’ नार्वेकरांची दुसरी तऱ्हा. ‘भाई’ नार्वेकर यांनी तर कमाल केली!
संविधानिक जबाबदाऱ्या
आणि किमान शिष्टाचाराची ऐशी की तैशी करून नार्वेकर हे एका शेतकऱ्याच्या जागेत घुसले व सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन त्या जागेची मोजणी करू लागले. तेव्हा ते शेतकरी कुटुंब चवताळून समोर आले व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना पळता भुई थोडी झाली हे एका व्हिडीओत स्पष्ट दिसते. नार्वेकरांसोबतच्या एका-दोघांनी या वेळी ‘चोप-प्रसाद’ खाल्ला. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडलेल्या या प्रकाराने राज्याची अब्रू धुळीस मिळाली आहे. त्या बेअब्रूच्या धुळीचे कण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोळ्यात गेले असतील तर त्यांनी डोळे उघडून या प्रकरणाकडे पाहावे. काय दर्जाची माणसे आपण संवैधानिक पदावर बसवली आहेत व तेथे बसून ही माणसं कशी बेबंदशाहीने वागतात हे दिसते. नार्वेकर बंधूंनी अलिबाग तालुक्यातील जमीन व्यवहारात धुमाकूळ घातला आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा गैरवापर करून जिल्हाधिकारी, महसूल, पोलीस प्रशासनास हाताशी धरून हे व्यवहार सुरू आहेत. अलिबागेत नवा मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची ही नांदी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या व गुजरातमधील शेठजींना पन्नासपट भावाने विकायच्या हे उद्योग विधानसभा अध्यक्ष व त्यांचे बंधू करतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकण पट्ट्यावर गुजरातमधील बिल्डरांचे राज्य आणण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष व इतर मंत्रिगण झटत आहेत. त्यातूनच म्हात्रोळी गावात त्यांच्याबरोबर झटापट झाली. त्या झटापटीत अनेकांना गावकऱ्यांचे फटके पडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे, असे हे झिरवळ-नार्वेकर प्रकरण आहे. मंत्रालयात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महाराष्ट्राच्या इज्जतीचे ‘वस्त्रहरण’ सुरू आहे, पण चिंता कुणाला?






























































