आता हे युद्ध राहिले नाही, सौरभ गांगुलीची पाकिस्तानी संघावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असले तरी आता ही लढत ना युद्ध वाटत ना कोणता मोठा सामना. हिंदुस्थानने वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी संघांचा चेंदामेंदा करत आपणच बाप असल्याचे दाखवून दिल्यानंतर हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने पाकिस्तानी संघाच्या खचलेल्या कामगिरीवर जोरदार प्रहार केला आणि हा सामना आता मोठा राहिला नसल्याचे आक्रमक विधान करत खळबळ उडवली.

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. हा सामना क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय सामना असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. या लढतीला महायुद्ध, ब्लॉकबस्टर, महासामना, पारंपारिक युद्ध अशी अनेक विशेषणे दिली जातात. मात्र काल झालेल्या लढतीने सर्वांच्या अपेक्षांची अक्षरशा राखरांगोळी केली. त्यामुळे गांगुलीनेही पाकिस्तानी संघावर जोरदार टीकास्त्र केले. कोलंबोतला हा सामना पाहिल्यानंतर हा सामना मोठा असल्याची संकल्पना कालबाह्य झाल्याचे दिसले. पूर्वी या लढतीत जो आक्रमकपणा होता, जो तोडीस तोड संघर्ष दिसायचा, तो आता नावालाही उरलेला नाही, अशा शब्दांत गांगुलीने पाकिस्तानी संघाची चिरफाड केली.

हिंदुस्थानने उभारलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 18 षटकांत 114 धावांत आटोपला. गांगुली पुढे म्हणाला,  ‘आपण अजूनही जावेद मियांदाद, वसीम अकरम यांची टीम डोळ्यासमोर ठेवतो; पण सध्याचा पाकिस्तान तो नाही. त्यामुळे या सामन्यातला अपेक्षित थरार संपला आहे.