
मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ही दुर्घटना तेथे काम करणारे व्यवस्थापक, वेल्डर, कन्स्लटंट आदींच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुलुंड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांना अटक केली. परंतु एक वेल्डर आणि कन्सल्टंट घटना घडल्यापासून पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
राम आशीष आणि साईप्रसाद अशी त्या दोघांची नावे आहेत. राम आशीष हा वेल्डर तर साईप्रसाद कन्सल्टंटचे काम पाहत होते. अटक आरोपी कुलदीप तसेच या दोघांनी चुकीच्या पद्धतीने तो स्लॅब बसवला.
आवश्यक काळजी न घेता हलगर्जीपणा केल्यामुळे तो स्लॅब धावती रिक्षा व एका कारवर कोसळला. त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदवत मुलुंड पोलिसांनी प्रोजेक्ट संचालक हरीश चौहान, प्रोजेक्ट व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरब सिंग, सुपरवायझर अवधूत इनामदार अशा पाच जणांना अटक केली होती. अवधूत वगळता उर्वरित चौघे मिलन रोड बिल्डटेकशी संबंधित होते. वेल्डर राम आशीष हादेखील मिलन रोड बिल्डटेकशी संबंधित आहे. दोघेही पसार असून मुलुंड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
























































