
भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून विलास पाटील यांनी पोलीस कोठडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटील यांना शुक्रवारी रात्री उशिरा आर्थिक गुन्हे शाखेने अटक – केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत असल्याने न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची परवानगी दिली.
महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आजपर्यंत होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी विलास पाटील यांना अटक केल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पाटील यांच्या वकिलांनी शनिवारीच न्यायालयात धाव घेतली. विलास पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून मुभा मिळावी असा विनंती अर्ज केला. या अर्जावर आज पोलिसांनी न्यायालयात आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
निवडणुकीत चुरस निर्माण झाली
महापौरपदासाठी भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारिक मोमीन, भाजकडून नारायण चौधरी, स्नेहा पाटील, शिंदे गटाचे बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे तारिक मोमीन, शिंदे गटाच्या अस्मिता नाईक, भाजपचे सुहास नकाते, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, कोणार्क विकास आघाडीचे अॅड. मयुरेश पाटील, समाजवादी पार्टीचे शेख अरीब मोहम्मद याकूब यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. विलास पाटील यांनी थेट पोलीस कोठडीतून अर्ज भरल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीमधील चुरस वाढली आहे.




























































