
‘नॅशनल पब्लिक रेडिओ’चे (NPR) माजी होस्ट डेव्हिड ग्रीन यांनी गुगलवर त्यांचा आवाज चोरल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. गुगलने आपल्या ‘NotebookLM’ या एआय पॉडकास्ट टूलसाठी त्यांच्या आवाजाचा आणि शैलीचा बेकायदेशीर वापर केल्याचा दावा करत ग्रीन यांनी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा काउंटी सुपीरियर कोर्टात खटला दाखल केला आहे.
डेव्हिड ग्रीन हे एनपीआरच्या ‘मॉर्निंग एडिशन’ आणि ‘लेफ्ट, राइट अँड सेंटर’ यांसारख्या लोकप्रिय पॉडकास्टसाठी ओळखले जातात. गुगलच्या एआय पॉडकास्ट टूलमधील पुरुषाचा आवाज हुबेहूब आपल्यासारखा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केवळ आवाजच नाही, तर बोलण्याची लय, शब्दांमधील चढ-उतार, बोलताना वापरले जाणारे ‘अह’ (uh) सारखे फिलर शब्द आणि इतर वैयक्तिक शैली देखील गुगलने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मित्रांच्या फोनमुळे प्रकार उघडकीस
२०२४ मध्ये जेव्हा ग्रीन यांच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना गुगलला आवाज लायसन्स दिला आहे का? असे विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा हा प्रकार समोर आला. एका सहकाऱ्याने त्यांना ई-मेल करून विचारले होते की, ‘हा आवाज तुझ्यासारखाच वाटतोय, तू गुगलला तुझे व्हॉईस लायसन्स दिले आहेस का?’ यानंतर जेव्हा ग्रीन यांनी स्वतः तो आवाज ऐकला, तेव्हा ते हादरून गेले. ‘तो आवाज ऐकणे हा एक धक्कादायक आणि भीतीदायक अनुभव होता. माझा आवाज हीच माझी खरी ओळख आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गुगलचे स्पष्टीकरण
याप्रकरणी गुगलने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गुगलचे प्रवक्ते जोस कॅस्टनेडा यांनी सांगितले की, ‘हे आरोप निराधार आहेत. NotebookLM मधील तो आवाज एका व्यावसायिक नटाचा असून, त्यासाठी रीतसर मानधन देऊन त्याची नियुक्ती करण्यात आली होती.’
काय फॉरेन्सिक अहवाल?
ग्रीन यांनी एका एआय फॉरेन्सिक कंपनीच्या अहवालाचा आधार घेतला आहे. या अहवालानुसार, त्यांच्या आवाजाची आणि एआय आवाजाची तुलना केली असता, ५३ ते ६० टक्क्यांपर्यंत साम्य असल्याचे दिसून आले आहे. डेव्हिड ग्रीन यांनी चिंता व्यक्त केली की, जर त्यांच्या आवाजाचा वापर करून उद्या एआयद्वारे चुकीची माहिती किंवा अफवा पसरवल्या गेल्या, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.
former npr host david greene sues google for stealing his voice for ai tool
famous radio host david greene has filed a lawsuit against google, alleging the company used his voice without permission for its notebooklm ai podcast feature.



























































