
उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फेरफार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. भाजप सरकार प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून जाणीवपूर्वक ठराविक समुदायांच्या आणि सपा समर्थकांच्या मतदारांची नावे यादीतून वगळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, हिंदुस्थानच्या लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा सर्वात पवित्र आहे, मात्र उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपकडून या अधिकारावरच गदा आणली जात आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओ (BLO) आणि इतर महसूल अधिकाऱ्यांवर दबाव टाकून विरोधी पक्षाच्या मतदारांची नावे कापली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे कमी करण्यात आली आहेत, तिथे पुन्हा एसआयआर प्रक्रिया करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, “प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदार यादी तपासावी आणि नावे कापली गेली असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.”



























































