
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मंगळवारी २०२१ चा विजेता संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. तर दुसरीकडे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने दिमाखात ‘सुपर ८’ फेरीत प्रवेश केला आहे.
मंगळवारी पल्लेकेले येथे झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला. या एका गुणासह झिम्बाब्वेने गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाला ‘सुपर ८’ मध्ये पोहोचण्यासाठी आयर्लंडचा विजय गरजेचा होता, मात्र पावसाने झिम्बाब्वेचा मार्ग मोकळा केला.
झिम्बाब्वेकडून धक्कादायक पराभव
याआधी झालेल्या सामन्यात सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून मोठा चमत्कार घडवला होता. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले होते. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांसारखे महत्त्वाचे गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर असल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजी कमकुवत झाली होती. याचा फटका ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत बसला.
सुपर ८ मध्ये हिंदुस्थानसमोर झिम्बाब्वेचे आव्हान
ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यामुळे आता झिम्बाब्वेचा संघ ‘सुपर ८’ मध्ये हिंदुस्थानच्या गटात सामील झाला आहे. गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोज एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे दोन्ही उभय संघात सामना रंगेल.
२००९ नंतर पहिल्यांदाच असे घडले
२००९ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतच बाहेर पडला आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेने या कामगिरीसह २०२८ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी (ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड) आपले थेट स्थान निश्चित केले आहे.



























































