
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटचा दुसरा दिवस आज बनवाबनवीमुळे तुफान गाजला. नोएडातील गलगोटिया विद्यापीठाने चिनी बनावटीचा एक रोबो डॉग स्वतःचा अविष्कार म्हणून एआय समिटमध्ये सादर केला. या रोबोचे व्हिडिओ व्हायरल होताच सत्य समोर आले आणि गलगोटियांच्या ‘फेक इन इंडिया’चे बिंग फुटले. मोदी सरकारचे हसे झाले. यामुळे सरकारने घाईघाईने या विद्यापीठाला समिटमधून हाकलून दिले. मात्र, विदेशी मीडियाने यासंदर्भातील बातम्या प्रसारित केल्यामुळे हिंदुस्थानची जगभरात बेअब्रू झाली. या प्रकारानंतर मोदी सरकारवर टीकेची झोड उठली असून ‘मोदी है तो मुमकीन है… गलाघोटदिया युनिव्हर्सिटी…’ अशा उपरोधिक प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या.
केंद्र सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निरीक्षणाखाली एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे. एआयमध्ये हिंदुस्थानने केलेली प्रगती दाखवण्याचा व ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्याचा समिटचा एक प्रमुख उद्देश आहे. एआयचा आविष्कार सादर करणारे अनेक स्टॉल्स समिटमध्ये लावण्यात आले आहेत. त्यात नोएडा स्थित गलगोटिया विद्यापीठाचाही स्टॉल होता. विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी तिथे ‘ओरायन’ नावाचा रोबोटिक कुत्रा ठेवला होता. हा कुत्रा 350 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा कुत्रा युनिट्री कंपनीने बनवलेले गो2 मॉडेल आहे. हा एक व्यावसायिक रोबो आहे. दोन ते तीन लाखांत हा रोबो ऑनलाईन खरेदी करता येतो.
म्हणे, बनवला नाही, विकसित केला!
बनवाबनवी पकडली गेल्यानंतर गलगोटिया विद्यापीठाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र खुलासा करतानाही त्यांचे पितळ उघडे पडले. ‘‘मीडियाने चुकीच्या पद्धतीने रोबो डॉगच्या बातम्या दिल्या आहेत. आम्ही हा रोबो बनवला असा आमचा दावा नाही. आम्ही तो विकसित केला आहे, असे म्हणालो होतो. आम्ही अजूनही त्यावर काम करत आहोत,’’ असे विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग यांनी सांगितले.
राहुल गांधी यांचा सरकारवर हल्ला
एआय समिटमधील गोंधळावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘‘एआय समिटच्या माध्यमातून हिंदुस्थानातील प्रतिभा आणि डेटाचा लाभ उठवण्याची गरज आहे. मात्र ही समिट पीआरचा ढिसाळ तमाशा बनून गेली आहे. हिंदुस्थानी डेटा विक्रीसाठी खुला केला गेला असून चिनी उत्पादनांचे प्रदर्शन सुरू आहे,’’ असा संताप राहुल यांनी ‘एक्स’वर व्यक्त केला.
आज सर्वसामान्यांना प्रवेश नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जागतिक पातळीवरील अनेक नेते समिटला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन करता यावे आणि काही महत्त्वाचे उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम सुरळीत पार पडावे यासाठी गुरुवारी भारत मंडपममध्ये सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच, समिटचा कालावधी एका दिवसाने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ही समिट शनिवारपर्यंत चालणार आहे.
मोदींचे व्हिजन म्हणून झाला होता उदोउदो
गलगोटिया विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने ओरायनची निर्मिती केली आहे, असे सांगण्यात आले होते. दूरदर्शन आणि पीटीआयने तशा बातम्याही दिल्या. मोदींच्या व्हिजनमुळे हिंदुस्थानात नवनवे आविष्कार घडत असल्याचा उदोउदो करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओरायनचा पह्टो ट्विट करून या संशोधनाचे काwतुक केले. हिंदुस्थानचे स्वदेशी मॉडेल जगाशी स्पर्धा करत आहे, असे वैष्णव म्हणाले. सोशल मीडियाने सत्य समोर आणल्यानंतर सगळ्यांची तारांबळ उडाली. आयोजकांनी तत्काळ विद्यापीठाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.
गलगोटिया सरकार!
गलगोटिया विद्यापीठाने केलेली चोरी पकडली गेली नव्हती, तोपर्यंत सरकारधार्जिण्या माध्यमांमध्ये विद्यापीठाचे गुणगान सुरू होते. सरकारचे मंत्रीही या रोबोटिक डॉगचे गोडवे गात होते. मात्र सत्य बाहेर आल्यामुळे सरकारची गोची झाली. यावर सोशल मीडियात ‘गलगोटिया सरकार’ असा उल्लेख करत नेटकऱ्यांनी तोंडसुख घेतले.


























































