
कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भाजपची सत्ता येताच विकासकामांचे ऑडिट सुरू झाले आहे. प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ वर्षांतील कारभाराची झाडाझडती भाजप आमदार किसन कथोरे यांच्या पत्राच्या अनुषंगाने लाचलुचपत सुरु केली आहे. एसीबी चौकशीचा शिंदे गटातील नगरसेवकांनी चांगलाच धसका घेतला असून त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत यावरून भाजप – शिंदे गटात खडाजंगीही झाली.
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शासकीय परिपत्रक वाचन सुरू असताना शिंदे गटाचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांनी गेल्या १५ वर्षांत नगर परिषदेत झालेल्या विकासकामांबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या एसीबीच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. या पत्राचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर भाजप गटनेते शरद तेली यांनी पालिकेचा कारभार पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे सांगत पत्राचे समर्थन केले. १५ वर्षांतील कारभाराच्या चौकशीमुळे शहरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
अॅण्टी करप्शनने हे तपशील मागितले
अॅण्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी नगर परिषदेकडे पत्र पाठवून २०१० ते २०२५ या कालावधीत झालेल्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. या कालावधीत कार्यरत असलेले मुख्याधिकारी व प्रशासक, कंत्राटदार, संबंधित वॉर्डचे नगरसेवक, विकासकामांच्या मंजूर बिलांची माहिती, लेखाधिकारी तसेच कामांची मोजमाप नोंद करणाऱ्या अभियंत्यांची नावे, राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून वर्षनिहाय प्राप्त झालेला निधी, सर्व सभा, निविदा प्रक्रिया आदी तपशील मागवण्यात आला आहे.


























































