रोखठोक – लुटियन्स गेले, राजगोपालाचारी आले; मोदींची नवी लहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी यांच्या मनात लहर आली म्हणून त्यांनी राष्ट्रपती भवनातून वास्तुशिल्पकार एडविन लुटियन्सचा पुतळाच काढला. लुटियन्स म्हणजे गुलामीच्या खुणा असे ते म्हणतात. लुटियन्स हा राज्यकर्ता नव्हता, तो कलाकार होता. सध्या राफेलपासून इतर अनेक बाबतीत आपण परदेशी मदतीवर अवलंबून आहोत. मग लुटियन्सवरच मोदींचा राग का? लुटियन्सने आजची नवी दिल्ली उभारली. त्याचा आस्वाद मोदीही घेत आहेत, पण लुटियन्सचा पुतळा काढण्यामागेही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.

सध्याचे पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांना इतिहासाची जाणीव अजिबात नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात किंवा इतिहास घडविण्याच्या प्रवाहात हे लोक कधीच नव्हते. त्यामुळे इतिहास घडवणाऱ्या लोकांविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे. हा द्वेष उफाळून येतो व इतिहासाच्या सर्व शिल्पांवर ते हातोडा चालवतात, त्यास ते राष्ट्रभक्ती म्हणतात. आम्ही गुलामीच्या खुणा पुसत आहोत असे ते यावर सांगतात. भारताच्या गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी अनेकांनी तुरुंगवास भोगला, रक्त सांडले, असंख्य लोक फासावर गेले. या गुलामीविरुद्धच्या लढ्यात मोदी व त्यांचा पक्ष कधीच नव्हता, पण सत्तेवर येताच (2014) त्यांनी इतिहासाचा वारसा, वास्तुशिल्प, ते निर्माण करणाऱ्या कलावंतांना नष्ट केले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे एडविन लुटियन्स. आपण ज्यास नवी दिल्ली म्हणून ओळखतो. त्यातील एका मोठ्या भागास ‘लुटियन्स दिल्ली’ म्हणून इतिहासात स्थान आहे. ही लुटियन्स दिल्ली अधिक नेमकी, नीटनेटकी, हिरवीगार, आखीव व स्वच्छ आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, देशोदेशीचे राजदूत, केंद्रीय मंत्री, खासदारांची आकर्षक निवासस्थाने या लुटियन्समध्ये येतात. राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान व अनेक सरकारी इमारती लुटियन्स दिल्लीचा भाग आहेत. या नवी दिल्लीचे निर्माण एडविन लुटियन्स या वास्तुशिल्पकाराने केले. त्यामुळे या संपूर्ण परिसरास ‘लुटियन्स दिल्ली’ म्हटले जाते. आपले पंतप्रधान मोदी यांना अचानक साक्षात्कार झाला की, लुटियन्स म्हणजे गुलामीचे प्रतीक आहे. लुटियन्सला संपवले पाहिजे. मोदी यांनी एक फर्मान काढले, राष्ट्रपती भवनातला लुटियन्सचा पुतळा काढा व तेथे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा लावा. पंतप्रधान मोदी यांची सूचना आता अमलात येत आहे.

मॅट रिडलेची वेदना

लुटियन्सचा पुतळा राष्ट्रपती भवनातून हटवल्याबद्दल त्याचा नातू मॅट रिडले (Matt Ridley) याने नाराजी व्यक्त केली आहे. हे अत्यंत दुःखद असल्याचे तो म्हणतो. लुटियन्स हा काही राजकारणी नव्हता. तो एक कलावंत होता व त्याने भारतातले पहिले नवी दिल्ली हे ‘स्मार्ट शहर’ वसवले. त्या शहराचा आस्वाद सध्या स्वतः मोदी घेत आहेत. लुटियन्सने नवी दिल्लीत हजारभर बंगले, वास्तू उभारल्या. मग ही गुलामीची प्रतीके आहेत. म्हणून राष्ट्रपती भवनापासून या सगळ्या वास्तूंवर मोदी सरकार बुलडोझर फिरवणार काय? मोदी यांचा कारभार तुघलकी आहे. ते कमी शिकलेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन त्यांची ‘खेचत’ असताना मोदी हसत होते. कारण बायडेन काय म्हणत होते ते त्यांना कळत नव्हते. अशा माणसाला इतिहास व संस्कृतीचे भान तरी कसे असेल? लुटियन्स याने भव्य असे साऊथ ब्लॉक, नार्थ ब्लॉक निर्माण केले. रायसीना हिल्सवर या वास्तू आहेत. भारतीय वैभवाची ही शिल्पे आहेत. सर्वच भारतीय राज्यकर्त्यांनी येथून देश चालवला. दहा वर्षे येथे सत्ता भोगल्यावर मोदी यांनी स्वतःचे नवे कार्यालय ‘सेवातीर्थ’ म्हणून उभे केले. आता गुलामीच्या बेड्या तुटल्या, पण भारताला अमेरिकेचा गुलाम करणारा ‘व्यापार करार’ मोदी यांनी याच ‘सेवातीर्थ’मधून केला. त्यामुळे देश, आमचा शेतकरी आजही गुलामच आहे. लुटियन्सने उभारलेली भारतीय संसद मोदींना ‘गुलामी’ वाटली, पण याच पार्लमेंटवर भारतीय क्रांतिकारकांनी तेव्हा बॉम्ब फेकले होते. त्यात सेनापती बापटदेखील होते. त्यामुळे संसद भवन हे क्रांतीचे व स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक होते. मोदींनी उभी केलेली नवी संसद म्हणजे एक कोंडवाडा आहे. आतमध्ये उत्साही व प्रेरणादायी असे काही नाही. गुजरातमधील एका भव्य ‘बॅन्क्वेट हॉल’प्रमाणे नव्या संसदेचे स्वरूप आहे. भारतीय लोकशाहीला शोभेशी ही वास्तू नाही, पण मोदींना वाटले म्हणून ऐतिहासिक संसद भवनास टाळे लावले गेले. मोदी प्रथम खासदार व भावी पंतप्रधान म्हणून दिल्लीत आले तेव्हा आधीच्याच संसदेच्या पायरीवर डोके टेकवून ते आत आले होते. तेव्हा त्यांना ‘गुलामी’ची आठवण झाली नाही.

सर्व काही निवडणुकांसाठी

मोदी यांनी लुटियन्सच्या जागी सी. राजगोपालाचारींना का आणले? तामीळनाडू, केरळच्या विधानसभा निवडणुका हेच त्याचे उत्तर. सी. राजगोपालाचारी हे दक्षिण भारतातील तामीळनाडूचे. त्यामुळे तामीळनाडू, केरळच्या प्रचारात मोदींना सी. राजगोपालाचारींचा विषय घेऊन मते मागायची आहेत. मी स्वतः दिल्लीत अनेक वर्षे आहे. सुरुवातीला 11, फिरोजशहा रोडवर मी राहत होतो. त्याच बंगल्यात स्वातंत्र्यानंतर सी. राजगोपालाचारींचा मुक्काम होता व हा बंगला लुटियन्सने बांधला म्हणून ते इतरत्र राहायला गेले नाहीत. या सर्व वास्तू व अचल संपत्ती आपण ब्रिटिशांकडून संघर्ष करून मिळवली. ही भारताची संपत्ती आहे. त्यात गुलामी वगैरेचा विषय येतो कोठे? भारताला मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. येथील सांस्कृतिक ठेवा अत्यंत संपन्न, पण त्याची ओळख करून देणे, त्याचा शोध घेणे इत्यादी महत्त्वाची कामगिरी बजावली ती ब्रिटिशांनी. आपल्या पूर्वजांनी एकापेक्षा एक वास्तुकलेचे, शिल्पकलेचे नमुने उभे केले, पण दीर्घकाळ अज्ञात राहिले. यात हडाप्पा-मोहेंजोदडो, अशोकाचे स्तंभ, अजंठा-वेरूळची लेणी, खजुराहो अशांचा समावेश होतो. सांस्कृतिक भारताचा शोध लावून त्याची शास्त्रीय चिकित्सा करण्याच्या कामी अनेक ब्रिटिशांची हयात खर्ची पडली. चार्ल्स विल्किन्सने भगवद्गीतेचे भाषांतर प्रसिद्ध केले होते. भारतीय भाषांतील ही वाङ्मयीन संपत्ती ब्रिटिश सत्ता गेल्यावरही राहणार आहे, या शब्दांत लॉर्ड हेस्टिंग्जने या प्रयत्नांचे स्वागत केले होते.

वैभव

लुटियन्सने राजधानीचे शहर म्हणून नवी दिल्ली उभारताना कलात्मकता, वास्तुकला व निसर्गाचा विचार केला होता. प्रत्येक वास्तूत भरपूर उजेड, मोकळी हवा व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. सफदरजंग रोड, अकबर रोड, अशोका रोड, सुनहरी बाग, रायसीना हिल्सवर बंगले आहेत, पण एका रोडवरील बंगले दुसऱ्या रोडवरील बंगल्यासारखे नाहीत. दिल्लीत राजधानी आणण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतल्यावर दिल्ली अपुरी पडू लागली. मग नवी दिल्ली उभारण्याचे ठरले. या दिल्लीने सारे स्वरूपच पालटले. लुटियन्समुळे दिल्लीवरील ‘मोगली’ खुणा पुसण्यास मदत झाली. स्वातंत्र्यानंतर अनेक राजवटी आल्या. पंतप्रधान आले व गेले, पण लुटियन्स दिल्लीला कोणी नाकारले नाही. राजधानीचे वैभव म्हणून सगळ्यांनी ते जतन केले. पंतप्रधान मोदी यांनी लुटियन्सचे अस्तित्व संपविण्यासाठी 20 हजार कोटींचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आणला. विमल पटेल नामक गुजरातच्या आर्किटेक्टला हे काम दिले. त्याने लुटियन्सची दिल्ली खोदून ठेवली. संगमरवर, मार्बलचे भव्य ठोकळे उभे केले. त्यात कल्पकता व वास्तुशास्त्र अजिबात नाही. लुटियन्सने नवी दिल्ली उभारताना त्यात ‘जान’ ओतली. पैसा मिळवणे हा त्याचा उद्देश अजिबात नव्हता. आजची दिल्ली म्हणजे एक दुःस्वप्न आहे. लुटियन्स हा एक वास्तुशिल्पकार होता. तो काही व्हाईसराय नव्हता.

मोदी यांनी राजकीय स्वार्थासाठी लुटियन्सचा पुतळा राष्ट्रपती भवनातून हलवला.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी मोदी यांचा उल्लेख ‘आधुनिक महम्मद गझनी’ असा केला होता. विकासाच्या नावाखाली मोदी यांनी गुजरातमध्ये शेकडो मंदिरे तेव्हा पाडली. त्यानंतर वाराणसीमध्येही शेकडो पुरातन मंदिरांवर बुलडोझर फिरवले.

आता त्यांना नवी दिल्लीचा वास्तुशिल्पकार एडविन लुटियन्सही नकोसा झाला!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]