
मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी असलेली ‘टास्क फोर्स’ आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. यामध्ये झोपडपट्ट्या, दाट वस्त्या आणि संवेदनशील भागात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात येणार आहे.
विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त करीत कार्यवाही करण्याची मागणी केली. घुसखोरांमुळे मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणूस आणि हिंदू समाज बाजूला फेकला जात असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. एजंटामार्फत बांगलादेशींचे दस्तऐवज तयार केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या लक्षवेधीच्या चर्चेत शिवसेना आमदार अॅड. अनिल परब, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला. या लक्षवेधीला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले.
हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा विषय
बांगलादेशी घुसखोर हा राजकीय विषय नसून राष्ट्रीय सुरक्षिततेचा विषय आहे. मुंबईत अशी पुठली वस्ती नाही, जिथे बांगलादेशी राहत नाही. झोपडपट्टय़ांमध्ये राहून ते कारखाने चालवतात. मुंबईमध्ये काय सुरू आहे हे पोलिसांना आणि महापालिकेला माहीत नाही का? असा सवाल उपस्थित करत सरकारने तीन महिन्यात स्पेशल टास्क फोर्स नेमून मुंबई आणि परिसरातील झोपडय़ांमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन करावे, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली.
हॉकर्सविरोधात संयुक्त मोहीम
महापालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहेत. कारवाईदरम्यान संबंधितांची कागदपत्रे तपासून माहिती नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जात असून यापुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
























































