इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donald trump and Khamenei

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. “जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असून इराणच्या जनतेसाठी हा न्यायाचा दिवस आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर ही घोषणा केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही खामेनी ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत खामने जीवंत असल्याचे म्हटले आहे.

इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेला खामेनी मारला गेला आहे. हा केवळ इराणच्या जनतेसाठीच नव्हे, तर त्या सर्व महान अमेरिकन लोकांसाठी आणि जगातील इतर अनेक देशांतील लोकांसाठी मिळालेला न्याय आहे, ज्यांना खानेमी आणि त्याच्या रक्तपिपासू गुंडांच्या टोळीने ठार केले किंवा कायमचे अपंग केले होते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,

खामे आमच्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्यंत प्रगत ट्रॅकिंग सिस्टीम्सपासून स्वतःला वाचवू शकला नाही. इस्रायलसोबत मिळून केलेल्या या कारवाईत, त्याला किंवा त्याच्यासोबत मारल्या गेलेल्या इतर नेत्यांना करण्यासारखे काहीही उरले नव्हते. इराणच्या जनतेसाठी आपला देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी आणि एकमेव संधी आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की, त्यांचे अनेक IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स), लष्करी आणि इतर सुरक्षा व पोलीस दलातील जवान आता लढू इच्छित नाहीत आणि ते आमच्याकडे अभय मागत आहेत. जसे मी काल रात्री म्हणालो होतो, आत्ता त्यांना अभय मिळू शकते, नंतर फक्त मृत्यूच मिळेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

मला आशा आहे की, IRGC आणि पोलीस शांततापूर्ण मार्गाने इराणच्या देशभक्तांशी हातमिळवणी करतील आणि देशाला त्याचे गतवैभव मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करतील. ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण केवळ खामेनीचा मृत्यूच झाला नाही, तर अवघ्या एका दिवसात तो देश मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त आणि नष्ट झाला आहे. आमचे अचूक आणि जोरदार बॉम्बहल्ले मात्र संपूर्ण आठवडाभर किंवा जोपर्यंत मध्य पूर्वेत आणि पर्यायाने संपूर्ण जगात ‘शांतता’ प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत अखंडपणे सुरूच राहतील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.