
सुमारे 40 वर्षांनंतर मुंबईहून कोकणात समुद्रमार्गाने प्रवासी सेवा आजपासून सुरू झाली. मुंबई ते विजयदुर्ग रो-रो बोट सेवेचा शुभारंभ झाला. मुंबईतील भाऊचा धक्का येथून 600 पेक्षा जास्त प्रवासी घेऊन या एम-टू-एम रो-रोने अवघ्या सात तासांत कोकणातील विजयदुर्गचा किनारा गाठला.
महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई–कोकण प्रवास अतिजलद करता यावा यासाठी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वीच ही सेवा सुरू होणार होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती होऊ शकली नव्हती. आज या सेवेला प्रारंभ झाला आणि मुंबईकर कोकणवासीयांचे बोटीने कोकणात जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
सात तासांत रो-रोने विजयदुर्ग गाठले असले तरी या अतिजलद प्रवासासाठी प्रवाशांना मात्र 3 हजार ते 9 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. रेल्वे किंवा एसटीने कोकणात जाणे किंवा तिथून मुंबईत परतण्यास 12 ते 14 तास लागतात. खासगी वाहनाने मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाण्याचा मार्गही वेळखाऊ ठरतो. अशा स्थितीत रो-रो हा नवा आणि अतिजलद पर्याय मुंबईकरांना आणि कोकणवासीयांना उपलब्ध झाला आहे.
प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सुटणार
प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सकाळी 8 वाजता भाऊचा धक्का येथून एमटूएम रो-रो विजयदुर्गसाठी रवाना होणार आहे. दुपारी 2 वाजता ती विजयदुर्ग येथे पोहोचेल. प्रत्येक गुरुवार आणि रविवारी विजयदुर्ग ते मुंबई असा तिचा प्रवास असेल. विजयदुर्ग जेट्टी येथून ती दुपारी 12 वाजता मुंबईसाठी प्रस्थान करेल आणि सायंकाळी 6 वाजता मुंबईत पोहोचेल.
प्रवासी तिकीट दर
इकोनॉमी 3,000
प्रीमियम इकोनॉमी 5,000
बिझनेस 7,000
प्रथम श्रेणी 9,000
वाहनांसाठी दर
एक्सएल 9,000
एल (लार्ज) 8,000
एम (मीडीयम) 7,000
एस (लहान) 6,000
दुचाकी 1,000
सायकल 600




























































