विषय ताकदीचा असेल तरच मराठी चित्रपट जगभरात पोहचेल! आधुनिकीकरणावरील परिसंवादात दिग्गजांचे मत     

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपट जगभरात पोहचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही दूरदृष्टी आणि सकस विषय महत्त्वाचे आहेत. लोकांच्या मनाचा ठाव घेणारा चित्रपट असावा, यावर दिग्गजांचे एकमत झाले.

विश्व मराठी संमेलनानिमित्त रविवारी ‘मराठी चित्रपटातील आधुनिकीकरण’ या विषयावरील परिसंवाद झाला. यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, महेश मांजरेकर, पुमार सोहोनी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व अभ्यासक संतोष रासकर यांनी सहभाग घेतला. संवादक प्रशांत साजणीकर होते. जब्बार पटेल म्हणाले की, मराठी माणसाला रूपक कथांऐवजी वास्तवता अधिक भावते. कारण, तो भावनात्मक आहे, म्हणून तर नटसम्राट मनात घर करतो. उत्तम गोष्ट असली तर साधे तंत्रही प्रभावी ठरते, हे मल्याळम चित्रपटांनी दाखवून दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलांना इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत मराठी शिकवा, नंतर इतर भाषा शिकवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्राची माती, मराठी आणि बोलीभाषा कळतील, असे ते म्हणाले.

मुंबई-पुण्याची मत्तेदारी संपली

ग्रामीण भागातून चांगले कवी, लेखक पुढे    येत आहेत, दर्जेदार मांडणी केली जात आहे, याचा अनुभव चित्रपट महोत्सवात येतो. यात ग्रामीण मुलांचे चित्रपट अव्वल ठरतात, यामुळे मुंबई-पुण्याची मत्तेदारी आता संपली आहे, असे पटेल म्हणाले.

आधुनिकीकरण सिनेसृष्टीला मारक

आता स्टुडीओत बसून एआयसारख्या तंत्रज्ञानाला नुसत्या सूचना देवून चित्रपट तयार होवू लागतील, हा धोक्याचा इशारा आहे, यामुळे चित्रपटसृष्टी संपेल, असे मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी  मांडले.