
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाचे सावट आता जागतिक विमानसेवेवर दिसू लागले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द (Airspace) सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली असून, याचा थेट परिणाम हिंदुस्थानी विमानसेवेवर झाला आहे. एअर इंडियासह अनेक प्रमुख कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्ये कपात केली असून अनेक उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.
एअर इंडियाने संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतर या देशांमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व विमान फेऱ्या निलंबित केल्या आहेत. हे निलंबन 2 मार्च 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू असेल. रविवारी देखील एअर इंडियाने 50 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सर्व हिंदुस्थानी एअरलाईन्स मिळून एकूण 350 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
या गोंधळामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्लीहून सुटणारी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. विशेषतः दिल्ली-झुरिच (AI151/152) आणि दिल्ली-कोपनहेगन (AI157/158) यांसारख्या महत्त्वाच्या मार्गावरील विमाने सोमवारी रद्द राहतील, असे एअरलाईनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या 6 विमानांवरही याचा परिणाम झाला असून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधण्यास सांगण्यात आले आहे.
इराण आणि इराकची हवाई हद्द बंद करण्यात आल्याने आता विमानांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. एअर इंडियाची युरोपला जाणारी विमाने आता इजिप्तच्या मार्गावरून प्रवास करतील, ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ 30 ते 40 मिनिटांनी वाढणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही अस्थिरता प्रवाशांच्या खिशाला आणि वेळेला कात्री लावणारी ठरत असून, परिस्थिती निवळण्याची प्रतीक्षा संपूर्ण जग करत आहे.

























































