
नितीश कुमार यांची महती व जादू संपली याची खात्री पटल्यावर भाजपने त्यांचा ‘गेम’ केला. बिहारात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे भाजपचे स्वप्न होतेच. संघाचेही बिहारवर लक्ष होते. नितीश कुमार व त्याआधी लालू यादवांमुळे बिहारात भाजपला हवे तसे यश मिळवता आले नाही. लालू थकले, नितीश कुमार थकले व झुकले. त्यामुळे बिहारचे मैदान मोकळे झाले. नितीश पर्वाचा अस्त झाला. उद्या त्यांचा उरलासुरला ‘जदयू’ पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. राजकीय संघर्ष हे बिहारचे वैशिष्ट्य होते. त्या संघर्षात कधीकाळी नितीश कुमारदेखील होते. त्या नितीश पर्वाचा करुण अस्त झाला आहे!
बिहारात नितीश कुमार पर्वाचा अस्त अखेर भाजपने घडवून आणला. नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवून बिहारच्या मुख्यमंत्रीपदी भाजप आपला माणूस विराजमान करत आहे. बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण हे अद्यापि उघड झालेले नाही, पण नितीश कुमार यांना बिहारातून अलगद बाहेर काढून भाजपने बिहारच्या राजकारणावर संपूर्ण नियंत्रण आता तरी मिळवले आहे. नितीश कुमार हे वीस वर्षांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी होते. मूळ समाजवादी विचारधारा असलेले नितीश नंतर ‘आयाराम-गयाराम’ प्रवाहात सोयीनुसार सामील झाले व देशभरात ‘श्रीमान पलटूराम’ म्हणून प्रख्यात झाले. नितीश कुमार यांनी अनेकदा कधी स्वतंत्र, कधी भाजपबरोबर, कधी लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर असे उलटसुलट उपद्व्याप केले. एका पक्षाबरोबर ‘युती’ करून निवडून यायचे व लगेच दुसऱ्याच पक्षाबरोबर सत्ता स्थापन करायची हा त्यांना छंदच जडला होता. यात ना त्यांचा मूळ समाजवादी विचार राहिला ना राजकीय नैतिकता, पण वीसेक वर्षे बिहारात मुख्यमंत्रीपदी राहण्याची किमया त्यांनी केली. लालू यादवांच्या घराणेशाहीवर ते सतत प्रहार करीत राहिले, पण बिहारातून ‘रामराम’ घेताना कुमारांनी निशांत या आपल्या कच्चे मडके असलेल्या चिरंजीवास ‘वारसदार’ केले. काळाने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे. आणीबाणीत जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनातून नितीश कुमारांचे नेतृत्व पुढे आले. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी स्वतःचे वलय निर्माण केले. बिहारात तुलनेत ‘अल्प’ असलेल्या ‘कुर्मी’ जातीतून ते आले. यादव, ठाकूर वगैरे मोठ्या जातीचे ते नव्हते. बिहारात जात हाच
राजकारणाचा आधार
आहे, पण ‘कुर्मी’ जातीच्या बळावर राजकारण करणे नितीश कुमारांना जरी शक्य नव्हते तरी एक स्वच्छ, प्रामाणिक चेहऱ्याचे नेतृत्व म्हणून त्यांनी जी ‘पुंजी’ निर्माण केली, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बिहारात अजिंक्य राहिले. अर्थात बिहारच्या राजकारणातला भ्रष्टाचार व बजबजपुरी काही संपली नाही. बिहार हे सुरुवातीपासून बिमारू राज्य होते. केंद्राने अधिकृतपणे ‘बिमारू’ राज्य म्हणून जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारांची धडपड होती. याचा अर्थ असा की, नितीश कुमार हे स्वतःला बिहारचा ‘विकास पुरुष’ म्हणवून घेत असले तरी त्यांचे राज्य विकासाच्या मार्गावरून पुढे नेण्यास ते असमर्थ ठरले. पाटण्यात रस्ते वगैरे दिसतात, मॉल्स निर्माण झाले. तेथील ठेकेदारांचे, राजकीय वर्गाचे राहणीमान सुधारले, पण गरीब, मध्यमवर्गीयांना मात्र विकासाची गंगा दिसली नाही. बिहारातील मोठा वर्ग नोकरी, रोजगारासाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता व इतर राज्यांतील शहरांकडेच धावत राहिला. बिहार हे भारतातील सगळ्यात कमी दरडोई उत्पन्न असलेले राज्य आजही आहे. तेथील 35 टक्के जनता आजही दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. बिहार सरकारने जाती सर्वेक्षण केले, त्यानुसार 94 लाख कुटुंबे प्रतिदिनी 200 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न कमावतात. 20 वर्षे नितीश कुमारांचे गतिमान शासन असतानाही बिहारचे दारिद्र्य हटले नाही. उद्योग, व्यापार, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था याबाबत प्रगती झाली नाही. भारताच्या लोकसंख्येत बिहारचा हिस्सा 9 टक्के आहे, पण राष्ट्रीय ‘जीडीपी’त बिहारचा वाटा फक्त 3.07 टक्के आहे. बिहार सरकारवर आज 3,19,618 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या नितीश कुमारांच्या सरकारने
जनहिताच्या
कोणत्याच खास योजना राबवल्या नाहीत. विधानसभा निवडणुका सुरू असताना उद्योग, रोजगार संधी योजनेच्या नावाखाली महिलांच्या खात्यात दहा-दहा हजार टाकण्यात आले. अशा एक कोटी लाभार्थी महिलांच्या मतांवर बिहारात भाजप-जदयूचे सरकार निवडून आले. हा सरळ सरळ भ्रष्टाचार व मतदारांना लाच देण्याचा प्रकार असतानाही नितीश कुमारांची राजकीय नैतिकता जागी झाली नाही व भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या सरकारचे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. भाजपकडे राज्याला मान्य होईल असा चेहरा नव्हता. त्यामुळे नितीश कुमारांना प्रचारात राज्यभर फिरवण्यात आले. नितीश कुमारांच्या ‘जदयू’पेक्षा भाजपने विधानसभेत जास्त जागा जिंकल्या, पण लोकलज्जेस्तव नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले व आता सहा महिन्यांनंतर त्यांना अलगद दूर केले. नितीश कुमार यांना विस्मरणाचा आजार जडला आहे. ते सार्वजनिक ठिकाणी मंचावर विचित्र वागू लागले आहेत. कधी महिलांचे हिजाब ओढ, कधी मोदींचे पाय पकड, कधी आणखी काही कर असे त्यांचे ‘चाळे’ लोक पाहत होते. नितीश कुमार यांची महती व जादू संपली याची खात्री पटल्यावर भाजपने त्यांचा ‘गेम’ केला. बिहारात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे भाजपचे स्वप्न होतेच. संघाचेही बिहारवर लक्ष होते. नितीश कुमार व त्याआधी लालू यादवांमुळे बिहारात भाजपला हवे तसे यश मिळवता आले नाही. लालू थकले, नितीश कुमार थकले व झुकले. त्यामुळे बिहारचे मैदान मोकळे झाले. नितीश पर्वाचा अस्त झाला. उद्या त्यांचा उरलासुरला ‘जदयू’ पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. राजकीय संघर्ष हे बिहारचे वैशिष्टय़ होते. त्या संघर्षात कधीकाळी नितीश कुमारदेखील होते. त्या नितीश पर्वाचा करुण अस्त झाला आहे!






























































