
इराण युद्धामुळे आखाती देशांत होणारी शेतमालाची निर्यात पुरती ठप्प झाली आहे. निर्यातीसाठी गेलेला माल मागच्या आठ दिवसांत पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये परत आला आहे. त्यातच नवा शेतमालही बाजारात आला आहे. त्यामुळे भाजीपाला व कांदा-बटाटय़ाची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला आहे. घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकऱयांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
चाकणमधील महात्मा जोतीराव फुले उपबाजार तसेच परिसरातील विविध भाजी मंडईतही या परिस्थितीचा परिणाम दिसू लागला आहे. घाऊक बाजारात अवघा दहा रुपये किलो भाव मिळत आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. किरकोळ बाजारातील भाजीपाल्याच्या दरावर अद्याप फारसा परिणाम झालेला दिसत नाही. युद्ध आणखी लांबल्यास किरकोळ बाजारातही भाजीपाला व फळांचे भाव खाली येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.






























































