
मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद झाल्यानंतर या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या प्रशस्त जागेवर सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
पालिकेच्या मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर 60 एकर जागा उपलब्ध होणार आहे. या जागेच्या वापराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून व्यवहार्यता तपासण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या मोठय़ा आणि महत्त्वाच्या जागेचा वापर कॅन्सर रुग्णालयासाठी करावा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कर्करोग रुग्णांसाठी असणाऱ्या सुविधांवर प्रचंड ताण आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यामुळे मुलुंडमध्ये उपलब्ध होणाऱ्या या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारल्यास रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. या ठिकाणी 10 एकर जागेवर रिलायन्स फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट किंवा गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यासारख्या परोपकारी संस्थांच्या सहकार्याने रुग्णालय उभारल्यास मुंबई महानगर आणि संपूर्ण राज्यासाठीच मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.





























































