
पुढील वर्षीपर्यंत सौर कृषी पंपाद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर वीजपुरवठा करण्यात येईल. सौर ऊर्जेची वीज बॅटरीमध्ये साठवून चोवीस तास वापरता येईल आणि इतर ग्रीडमध्येही कशी वापरता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 1 जुलैपासून दूध संकलन उद्योगाच्या वीज दरात कपात केल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्य वीज नियामक आयोगाने दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबत सदस्य अनिल पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. महावितरणने सकाळी व संध्याकाळी वीज दर वेगळे ठेवले आहेत. संध्याकाळी वेगळे दर आकारण्यात येत असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. त्याचा फटका दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘चिलिंग प्लँट’ला बसत आहे असे ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोल्ड स्टोअरेजसाठी सौर ऊर्जेची चाचपणी होत आहे, पण त्यामध्ये व्यवहार्यता आढळून येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत चार हजार मेगावॅटचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून आठ लाख शेतकऱ्यांना निरंतर वीज देण्यात येत आहे. अतिरिक्त दहा हजार मेगावॅट वीज तयार होत आहे. त्यातून 75 टक्के शेतकऱ्यांना वीज देता येईल. पुढच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांना निरंतर वीज देता येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
1 जुलैपासून नवीन दर
दूध संकलन उद्योगांसाठी विजेच्या दरात कपात करण्याबाबत राज्य सरकारने केलेली मागणी राज्य वीज नियामक आयोगाने मान्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून नवे दर लागू होणार असून वीज दरात मोठी कपात करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नव्या आदेशानुसार, 1 जुलै 2026 पासून नवे दर लागू होणार असून दूध संकलन उद्योगासाठी वीजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. पूर्वी लघुदाब वाणिज्य श्रेणीतील दर हा 16 रुपये 55 पैसे प्रति युनिट होता, तो आता 7 रुपये 31 पैसे प्रति युनिट करण्यात आला आहे. तसेच, उच्चदाब वाणिज्य श्रेणीत पूर्वी 13 रुपये 81 पैसे प्रति युनिट दर आकारले जात होते, ते आता 9 रुपये 6 पैसे प्रति युनिट करण्यात आले आहेत. यामुळे निश्चितपणे दूध संकलन उद्योग आणि त्यामार्फत आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.





























































