
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवार, 12 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण कार्यतालिकेत 40 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित केले आहे. 3 वर्षे सुनावणी चाललेल्या या प्रकरणात न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी न्यायालयाने अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. जानेवारीत वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती. आता येत्या गुरुवारी न्यायालय दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेच्या प्रकरणात ‘पक्षांतरा’बाबत महत्त्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेनेच्या सुनावणीकडे आहे.
गद्दारांच्या ‘पात्रते’चा फैसला होणार
गद्दारी केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाबरोबर गद्दारांच्या पात्रतेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालय एकाच वेळी सुनावणी घेणार आहे.

































































