उन्हाच्या भट्टीत मुंबईकर घामाघूम, आठवडाभर तापमान उच्चांक पातळीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह उत्तर कोकणात मंगळवारी उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली. मुंबई शहर व उपनगरांत कमाल तापमानाने अक्षरशŠ कहर केला. सलग दुसऱ्या दिवशी पारा 42 अंशांवर झेपावला. शहराच्या अनेक भागांतील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. मुंबईची जणू भट्टी झाल्यासारखी लाहीलाही मुंबईकरांना सहन करावी लागली. मागील पाच वर्षांतील सर्वात जास्त तापमानाची नोंद दिवसभरात झाली. पुढील आठवडाभर कमाल तापमान 35 ते 37 अंशांच्या उच्चांकी पातळीवर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या महिन्यात मुंबईकरांनी गंभीर प्रदूषणाचा सामना केला. त्यापाठोपाठ मार्चच्या सुरुवातीपासून तापमानात भयंकर वाढ होऊ लागली आहे. मागील दोन दिवस शहरात उष्णतेची लाट धडकल्याने नागरिकांची प्रचंड दमछाक झाली आहे. सोमवारपाठोपाठ मंगळवारी 42 अंश कमाल तापमान नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान मोजणी केंद्रावर तापमानात सरासरीपेक्षा 7.6 अंशांची मोठी वाढ झाली. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढले. शहराच्या विविध भागांत तापमानाने कहर केल्यामुळे मुंबईकरांना दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले. कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या नोकरदारांना उष्माघाताचा त्रास झाला.

z कुलाबा वेधशाळेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी राम मंदिर परिसरात सर्वाधिक 42.4 अंश तापमान होते. तसेच विक्रोळीत 41.6 अंश, भायखळ्यात 40 अंश, वांद्रे येथे 39.7 अंश, विद्याविहारमध्ये 39.5 अंश, चेंबूरमध्ये 38.8 अंश आणि दहिसर परिसरात 38.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली.