अँटिलिया स्फोटक प्रकरण, प्रदीप शर्मा यांचे अपील हायकोर्टाने फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अँटिलिया स्फोटक प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्येप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. विशेष न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने प्रदीप शर्मा यांचे अपील फेटाळले.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने जून 2021 मध्ये शर्मा यांना अटक केली होती. त्यांच्यावर खून, गुन्हेगारी कट, अपहरण, पुरावे नष्ट करणे आणि पुरावे लपविणे अशा गुन्ह्यांसह यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी शर्मा यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. या निर्णयाला शर्मा यांनी अॅड. निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत हायकोर्टात आव्हान दिले. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती सुमन शाम यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवारी यावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा न्यायालयाने शर्मा यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांचे अपील फेटाळून लावले.