
बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका श्रीमती अनिता पाटील यांच्या आदेशाने अभिनव नगर वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप अभिनव गृहनिर्माण संस्थेच्या काही सदस्यांनी जाहीरपणे निदर्शने आणि व्हिडीओ व्हायरल करून केला. तो धादांत खोटा आहे, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक किरण पाटील (दक्षिण) यांनी एका पत्रकाद्वारे नमूद केले.
किरण पाटील आपल्या पत्रकात म्हणतात, उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीने उद्यानातील अवैध मार्ग बंद करण्याचे निर्देश दिले होते. अभिनव नगर वसाहतलगत असलेल्या अवैध प्रवेशमार्गाची पाहणी क्षेत्रीय कर्मचाऱयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली. त्यावेळी अभिनव संस्थेच्या पदाधिकाऱयांनी कामात अडथळा आणला. जनतेची दिशाभूल करणारी चुकीची माहिती व्हिडीओ व्हायरल करून पसरवली. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. अभिनव सोसायटीच्या 2250 चौ. फूट क्षेत्रावर कोणतेही अतिक्रमण संजय गांधी उद्यान प्रशासनाने केलेले नाही अथवा आदेश देण्यात आलेले नाहीत.
सीमारेषेबाबत काही आक्षेप असल्यास सक्षम प्राधिकाऱयांकडे अभिनव संस्थेने दाद मागावी, असेही उपसंचालक किरण पाटील यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. संजय गांधी उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांचा कोणताही संबंध नाही. अनिता पाटील यांच्याविषयी अभिनव गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी केलेली विधानेही चुकीची व तथ्यहीन आहेत, असेही किरण पाटील यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.





























































