
महाबळेश्वर बंदनंतर आता ‘आम्ही महाबळेश्वरकर’ चळवळीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर करून रस्ता रोको करण्याचा इशारा दिला.
महाबळेश्वर–पाचगणी–वाई ते सुरूरदरम्यानच्या रस्त्याच्या अकार्यक्षम व रखडलेल्या कामाबाबत शासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन हस्तक्षेप करावा; अन्यथा येत्या काळात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली. मात्र, या बैठकीबाबत शहरातील आंदोलनकर्त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याने आम्ही महाबळेश्वरकर चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, अफझल सुतार, संदीप साळुंखे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, अमित ढेबे, टॅक्सी संघटनेचे दादाभाई मानकर, इरफान कुरेशी, मारुती डोईफोडे, विजय नायडू, राजेंद्र बावळेकर, इमामभाई नालबंद, नंदकुमार वायदंडे आदी उपस्थित होते.
मंत्रालयातील बैठकीत स्थानिकांना सहभागी करा
महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असली, तरी या बैठकीत केवळ एम.एस.आय.डी.सी चे अधिकारी व ठेकेदार यांच्यापुरती चर्चा मर्यादित न ठेवता ‘आम्ही महाबळेश्वरकर’ चळवळीच्या आंदोलनकर्त्यांनाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा विधीमंडळात
आमदार शशिकांत शिंदे यांनी महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱयांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सभागृहात सांगितले.



























































