
आखाती प्रदेशातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कतारमधील हिंदुस्थानी दूतावासाने अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दूतावासाच्या माहितीनुसार, 10 मार्च रोजी कतार एअरवेजच्या विमानांद्वारे सुमारे 1000 हिंदुस्थानी प्रवासी नवी दिल्ली, मुंबई आणि कोची येथे परतले.
हिंदुस्थानी दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसह आपत्कालीन प्रकरणांसाठी प्रवास सुलभ करण्यासाठी कतार एअरवेजशी समन्वय साधण्यात आला. मानवतावादी कारणांवर काही प्रवाशांना प्राधान्य देण्यात आल्याबद्दल दूतावासाने कतार एअरवेजचे आभारही मानले.
दूतावासाने पुढे सांगितले की, 11 मार्च रोजी नवी दिल्लीसाठी कतार एअरवेजचे आणखी एक विमान नियोजित आहे. तसेच भारतीय नागरिकांना सलवा सीमारेषेमार्गे सौदी अरेबियात प्रवेश देण्यासाठी 96 तास वैध असलेले तात्पुरते ट्रान्झिट व्हिसा देण्यात आले आहेत. या मार्गाने अनेक भारतीय नागरिकांना पुढील प्रवासाची सुविधा मिळत आहे.
कतारमध्ये अडकलेली हिंदुस्थानची बास्केटबॉल संघाची टीमही सौदी अरेबियामार्गे विमानाने प्रवास करून सुरक्षितपणे हिंदुस्थानात परतली, अशी माहिती दूतावासाने दिली. या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल सौदी अरेबिया आणि कतारच्या अधिकाऱ्यांचेही आभार मानण्यात आले.
भारतीय दूतावासाने स्पष्ट केले की, त्यांचा 24×7 नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन्स तसेच भारतीय समुदाय संघटना, ICC आणि ICBF यांचे हेल्पडेस्क सतत कार्यरत आहेत, ज्यामुळे अडचणीत असलेल्या भारतीयांना मदत मिळत आहे.
दरम्यान, बहरीनमधील हिंदुस्थानी दूतावासाने मंगळवारी एक सल्लागार सूचना जारी करत स्पष्ट केले की, खासगी व्यावसायिक गटांकडून बहरीनमधून शेजारील देशांमध्ये वाहतूक व्यवस्था करण्याच्या कोणत्याही उपक्रमाशी दूतावासाचा संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा खासगी व्यवस्थांबाबत सावध राहावे, असेही दूतावासाने सांगितले.
























































