
सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तलासरीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण जिल्हाप्रमुख गिरीश राऊत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना तलासरी तालुकाप्रमुख भीमसिंग कुऱ्हाडे यांच्या विशेष पुढाकारातून हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, पालघर लोकसभा निरीक्षक अजय ठाकूर, जिल्हा युवाधिकारी रॉकी तांडेल, उपजिल्हाप्रमुख हरिश्चंद्र खुलात, उपतालुकाप्रमुख अशरफ खान यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे काम घराघरात पोहोचवा
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तलासरीमध्ये संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याच कार्यालयात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच या योजनांचा फायदा कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनसेवा करता करता या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेले काम घराघरात पोहोचवा. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा, असे आवाहन जिल्हाप्रमुख गिरीश राऊत यांनी शिवसैनिकांना केले.





























































