
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. इराणने होमुर्झची सामुद्रधुनी बंद केल्या आणि आखाती देशांनी तेल, गॅस उत्पादनात कपात केल्याने हिंदुस्थानात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे. तसेच याआधी गॅसचे बुकिंग 15 दिवसांनी करता येत होते, मात्र आता गॅस बुकिंग 25 दिवसांनी करावे लागणार आहे.
व्यावसायिक गॅस पुरवठा होत असल्याने राज्यातील 30 टक्के हॉटेल बंद झाले आहे. जर गॅस पुरवठा झाला नाही तर येत्या काही दिवसात हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णत: बंद होतील. त्यामुळे नोकरी, शिक्षणानिमित्त परगावामध्ये राहणाऱ्या आणि खानावळी, हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारही काही स्पष्ट धोरण आखत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुधवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण; गॅस काढा, गॅस काढा; गटारीतून गॅस काढा, लाडक्या बहिणींवर गॅसवर ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण; गॅस काढा, गॅस काढा; गटारीतून गॅस काढा, ‘मविआ’ची विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी pic.twitter.com/FoMWBqzMgz
— Saamana Online (@SaamanaOnline) March 11, 2026
सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी!
राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
काल विधानसभेचे कामकाज रात्री एक वाजेपर्यंत सुरू असताना कँटीन बंद होते. बाहेरील हॉटेल्स गॅसअभावी बंद आहेत. मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 30 टक्के हॉटेल्स गॅस तुटवड्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली. गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार वाढण्याची भीती असून, काल HPC ची 18 लाख रुपयांच्या सिलिंडरची गाडी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने भयावह स्थिती आहे. गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत. महिला भगिनींमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.



























































