
उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील शुल्लक वादाचे रूपांतर भीषण दुर्घटनेत झाले असून, रागाच्या भरात एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह स्वतःला पेटवून घेतले. या भीषण आगीत निरागस चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला, तर पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीदेखील गंभीररित्या भाजला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेखराज अमरनानी (37) हे त्यांची पत्नी (34) कोमल उर्फ चांदनी आणि दीड वर्षांचा मुलगा गर्व यांच्यासह शहरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या कोमलने टोकाचे पाऊल उचलत घरात असलेले थिनर स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि मुलाला छातीशी घट्ट धरून स्वतःला पेटवून दिले. कोमलच्या किंचाळ्या ऐकून लेखराज तिला वाचवण्यासाठी धावला. त्याने मुलाला तिच्या तावडीतून सोडवून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे बाळ पूर्णपणे होरपळले होते.
घराचा दरवाजा उघडा असल्याने आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि आग विझवून तिघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दीड वर्षाच्या गर्वला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, लेखराज आणि कोमल या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. कौटुंबिक कलहामुळे ते आधीपासूनच वेगळे राहत होते, मात्र नुकतीच त्यांनी शहरात नवी जागा घेतली होती आणि त्याचे पूजनही केले होते. या घटनेबाबत माहिती देताना ठाणे प्रभारी निरीक्षक श्याम प्रताप यांनी सांगितले की, घरगुती वादातून ही टोकाची घटना घडली असून मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
























































