
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे हिंदुस्थानातील हवाई वाहतुकीवर देखील परीणाम झाला आहे. यालाच अनुसरुन दिल्ली विमानतळाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना खासकरून परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी देण्यात आल्या आहेत. Delhi International Airport Limited (DIAL) ने बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
एअरपोर्टच्या म्हणण्यानुसार, मध्यपूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो किंवा काही उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या संबंधित विमान कंपन्यांकडून उड्डाणाची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळाने सकाळी ९ वाजता जारी केलेल्या सल्लागारात म्हटले आहे की, प्रवाशांनी रिअल-टाइम फ्लाइट अपडेटसाठी अधिकृत वेबसाइट तपासावी. तसेच इमिग्रेशनसंदर्भातील मदतीसाठी FRRO कडे ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल. विमानतळाजवळ मुक्कामासाठी एरोसिटी परिसरातील हॉटेल्सचा पर्यायही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उड्डाण उद्योगावर इंधन खर्चाचा ताण वाढत आहे. म्हणूनच एअर इंडियाने मंगळवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर इंधन अधिभार टप्प्याटप्प्याने वाढवण्याची घोषणा केली. एअरलाइनच्या निवेदनानुसार, विमान कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात सुमारे ४० टक्के वाटा असलेल्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमती मार्च २०२६ च्या सुरुवातीपासून लक्षणीय वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांनी उड्डाणापूर्वी माहिती तपासूनच प्रवास करावा, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये एटीएफवरील जास्त उत्पादन शुल्क आणि व्हॅटमुळे हा खर्च आणखी वाढतो, ज्यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. नवीन इंधन अधिभार तीन टप्प्यांत लागू केला जाणार असून तो एअर इंडिया एक्सप्रेससह एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांवर लागू असणार आहे.
























































