
नेहमी वाहनचालकांच्या मृत्यूला जबाबदार ठरणारा खड्डा उत्तर प्रदेशातील एका महिलेसाठी जीवदान देणारा ठरला आहे. ब्रेनडेड झालेल्या महिलेला अंत्यसंस्कारीसाठी नेत असताना अॅम्बुलन्स रस्त्यावरील खड्ड्यात आदळली. अॅम्बुलन्स खड्ड्यात आदळल्याने जोराचा झटका बसला आणि ब्रेनडेड महिला शुद्धीवर आली. उत्तर प्रदेशातील पीलीभात जिल्ह्यात ही चमत्कारीक घटना घडली.
पीलीभात जिल्ह्यातील गोकुलपुरम कॉलनीत राहणारी विनिता शुक्ला ही महिला 22 फेब्रुवारी रोजी घरामध्ये अचानक बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला बरेली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विनिता यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. मात्र विनिता यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. व्हेंटिलेटर काढताच विनिता यांचा मृत्यू होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे जड अंतकरणाने कुटुंबीयांनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
24 फेब्रुवारी रोजी विनिता यांना अॅम्बुलन्समधून घरी घेऊन चालले होते. घरी सर्व नातेवाईक जमले होते. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात लाकडं गोळा करण्यात आली. यादरम्यान घराकडे येत असताना रस्त्यावरील खड्ड्यात अॅम्बुलन्स आदळली. यामुळे विनिता यांना जोरदार झटका बसला आणि त्या शुद्धीवर आल्या. कुटुंबीयांनी अॅम्बुलन्स डॉ. राकेश न्यूरो सिटी रुग्णालयाकडे वळवली. रुग्णालयात 14 दिवस उपचार घेतल्यानंतर विनिता यांनी घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे.


























































