प्रत्येकाला माहिती आहे पंतप्रधानांनी तडजोड केलीय; नरवणे, एपस्टीन आणि अदानींचा उल्लेख करत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहातील लोकशाही प्रक्रिया आणि सभापतींच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सभागृहात वारंवार त्यांचे नाव घेतले जाते, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात; मात्र ते बोलण्यासाठी उभे राहिल्यावर त्यांना वारंवार थांबवले जाते.

राहुल गांधी म्हणाले, “सभागृहात अनेकदा लोकशाही प्रक्रिया आणि सभापतींच्या भूमिकेबाबत चर्चा होते. अनेक वेळा माझे नाव घेतले जाते आणि माझ्याबद्दल गोष्टी सांगितल्या जातात. हे सभागृह हिंदुस्थानच्या जनतेच्या अभिव्यक्तीचे स्थान आहे. हे सभागृह केवळ एका पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते.”

ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक वेळी आम्ही बोलण्यासाठी उभे राहतो तेव्हा आम्हाला बोलण्यापासून रोखले जाते. अनेक वेळा मला बोलू दिले गेले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले गेले नाही.”

सभागृहात त्यांचे नाव घेतले गेले असल्याने त्यांना उत्तर देण्याचा अधिकार असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, “माझे नाव घेतले गेले आहे. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. पण अनेक वेळा मला थांबवले गेले.”

यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, मागील वेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांविषयी तडजोडी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी काही गंभीर मुद्दे मांडले होते आणि त्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती.

राहुल गांधी यांनी यावेळी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी संबंधित मुद्द्याचाही उल्लेख केला. जनरल नरवणे हे हिंदुस्थानचे माजी लष्करप्रमुख असून त्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही संरक्षण आणि धोरणात्मक मुद्द्यांच्या संदर्भात त्यांच्या नावाचा उल्लेख राहुल गांधी यांनी सभागृहात केला.

तसेच त्यांनी तथाकथित “एपस्टिन फाइल्स” या आंतरराष्ट्रीय वादग्रस्त प्रकरणाचाही उल्लेख केला. अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एपस्टिन यांच्याशी संबंधित या प्रकरणात अनेक प्रभावशाली व्यक्तींशी संबंध आणि गोपनीय कागदपत्रांबाबत जगभरात चर्चा झाली होती. त्या संदर्भातील मुद्देही त्यांनी उपस्थित केल्याचे सांगितले.

“मागील वेळी मी पंतप्रधान तडजोड केलेले असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मी नरवणे यांचा मुद्दा उपस्थित केला. मी एपस्टिन फाइल्सचा मुद्दा उपस्थित केला. आमचे पंतप्रधान तडजोड केलेले आहेत, हे सर्वांना माहिती आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी सभागृहात केला.