पती-पत्नीतील रोजची भांडणं म्हणजे ‘छळ’ नव्हे; मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैवाहिक वादाच्या प्रकरणांत मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पती आणि पत्नीमधील मतभेद, दाम्पत्यामध्ये रोज होणारी भांडणे म्हणजे छळ नव्हे. अशा भांडणांना भारतीय दंड संहितेच्या ‘कलम 498 अ’ अंतर्गत छळ वा क्रूरतेचा गुन्हा म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिला. याचवेळी न्यायालयाने क्रूरतेच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विवाहितेच्या सासरच्या चौघा जणांची निर्दोष मुक्तता केली.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध 2009 मध्ये भांडुप पोलिस ठाण्यात क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे 5 लाखांची मागणी केली. ती रक्कम मिळवण्यासाठी तगादा लावत सासरच्या मंडळींनी आपला छळ केला, असा आरोप विवाहितेने केला होता. या प्रकरणात विवाहितेच्या पतीला सप्टेंबर 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. पती दररोज भांडणे करुन आपली छळवणूक करीत होता, असेही विवाहितेने एफआयआरमध्ये म्हटले होते. तथापि, मुलुंडचे दंडाधिकारी एन. जी. व्यास यांनी पत्नीचा हा दावा धुडकावून लावला. तक्रारदार विवाहितेने सुरुवातीला दिलेल्या अर्जात आणि नंतरच्या एफआयआरमध्ये मोठी तफावत असल्याचे निरिक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले.

तसेच केवळ पैशांची मागणी किंवा कौटुंबिक वाद म्हणजे ‘क्रूरता’ म्हणता नाही. पती आणि पत्नीमध्ये दररोज भांडणे होणे ही दाम्पत्यातील सर्वसाधारण गोष्ट आहे. दाम्पत्यातील दैनंदिन भांडणे किंवा मतभेद, पती-पत्नीमधील तीव्र नातेसंबंध आणि अशा तीव्र नातेसंबंधांमुळे उद्भवणारे संघर्ष हे भारतीय दंड संहितेच्या कलम 498-अ अंतर्गत क्रूरतेचे कारण बनू शकत नाहीत. पती-पत्नीमध्ये वैवाहिक संबंध तीव्र होणे, अशाप्रकारचे संघर्ष सामान्य वैवाहिक जीवनात दिवसेंदिवस उद्भवतात. अशा संघर्षांना क्रूरता म्हणू शकत नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि चारही आरोपींची विवाहितेचा छळ केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.