
आखाती प्रदेशातील संघर्षामुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम आता रेल्वेच्या खाद्यसेवांवरही होत असल्याचे समोर आले आहे. देशभरात एलपीजी सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)च्या केटरिंग सेवांवर परिणाम होत आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास रेल्वेमध्ये शिजवलेले जेवण देण्याची सेवा तात्पुरती बंद करण्याचा आणि तिकीट बुक करताना जेवण प्री-बुक केलेल्या प्रवाशांना परतावा देण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून IRCTCने आपल्या केटरिंग परवानाधारकांना पर्यायी उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एलपीजी टंचाईचा सर्वाधिक परिणाम IRCTCच्या बेस किचनवर होत आहे. येथेच रेल्वे गाड्यांसाठी जेवण तयार केले जाते आणि त्यानंतर ते पॅन्ट्री कारमध्ये पाठवले जाते. पॅन्ट्री कारमध्ये मुख्यतः अन्न वितरण आणि गरम करण्याचे काम केले जाते आणि तेथे एलपीजी सिलिंडर ठेवले जात नाहीत. मात्र बेस किचनमधील अडचणीमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी जेवण तयार करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
10 मार्च रोजी पाठवलेल्या पत्रात IRCTCने रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जनआहार केंद्रांना एलपीजीचा तुटवडा भासल्यास पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, पश्चिम आशियातील आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे व्यापारी एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्यामुळे खाद्यसेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
IRCTCने केटरिंग युनिट्सना नियमित खाद्यपदार्थांबरोबरच ‘रेडी टू ईट’ (RTE) अन्नपदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांची मागणी पूर्ण करता येईल.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, IRCTC देशभरात दररोज सुमारे 17 लाख जेवण प्रवाशांना उपलब्ध करून देते. यासाठी बेस किचन आणि ऑनबोर्ड केटरिंग सेवांचा वापर केला जातो.
IRCTCने स्पष्ट केले की, या उपाययोजनांचा उद्देश रेल्वे स्थानकांवरील खाद्यसेवा सुरू ठेवणे आणि पुरवठा खंडित झाल्यास प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करणे हा आहे. एलपीजीचा पुरवठा त्यांच्या क्षेत्रात कमी झाला किंवा बंद झाला तर त्याची तात्काळ माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना केटरिंग कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत रेशनिंग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पाइपद्वारे मिळणाऱ्या घरगुती गॅसला आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वापरणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. आखाती प्रदेशातील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या गॅस वाहतुकीवर परिणाम झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
























































