इराण – इस्रायल संघर्षादरम्यान हिंदुस्थानने रशियाकडून विकत घेतले 3 कोटी बॅरेल कच्चे तेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल इराण दरम्यान वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असताना हिंदुस्थानने समुद्रात अडकून पडलेले सुमारे 30 दशलक्ष (3 कोटी) बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले आहे. अमेरिकेने 30 दिवसांची विशेष सूट दिल्यानंतर हिंदुस्थानने ही खरेदी केली असल्याचे वृत्त ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या निर्णयानुसार, समुद्रात आधीच अडकून पडलेल्या रशियन तेलाच्या जहाजांची खरेदी करण्यास हिंदुस्थानला परवानगी देण्यात आली. या सूटीनंतर हिंदुस्थानमधील रिफायनरी कंपन्यांनी त्वरीत हालचाल करत उपलब्ध असलेले तेलाचे कार्गो खरेदी करण्यास सुरुवात केली. या तेलापैकी बरेचसे कार्गो आधीच आशियाई समुद्र क्षेत्रात होते, त्यामुळे पश्चिम आशियातून होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर हा पर्याय तातडीने उपलब्ध झाला.

यापूर्वी हिंदुस्थानने रशियन तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली होती आणि त्या बदल्यात सौदी अरेबिया आणि इराकमधून कच्चे तेल आयात करण्यास सुरुवात केली होती. मात्र हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे थांबवण्याचा अधिकृत निर्णय कधीच जाहीर केलेला नाही आणि अजूनही काही प्रमाणात रशियन तेलाचा पुरवठा सुरू आहे.

मात्र अलीकडील काही महिन्यांत रशियन तेल आयातीचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर पारंपरिक तेल वाहतूक मार्गांवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जहाज वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. हिंदुस्थानच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 40 टक्के तेल या मार्गाने येते. मात्र या मार्गावरील अडथळ्यांमुळे हिंदुस्थानमधील रिफायनरी कंपन्यांनी पर्यायी पुरवठा सुरक्षित करण्यासाठी जलद हालचाल केली आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अमेरिकेने दिलेल्या सूटीनंतर हिंदुस्थानमधील रिफायनरी कंपन्यांनी स्पॉट मार्केटमधील जवळपास सर्व उपलब्ध रशियन तेलाचे कार्गो खरेदी केले. यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सुमारे 10 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने किमान 10 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले. उर्वरित तेल इतर हिंदुस्थानी रिफायनरी कंपन्यांनी घेतले. या तेलापैकी बरेचसे आधीच टँकर जहाजांमध्ये भरलेले होते आणि आशियाई समुद्र क्षेत्रात प्रवास करत होते, मात्र त्यासाठी अद्याप कोणताही खरेदीदार निश्चित झाला नव्हता.

या खरेदीमध्ये रशियाच्या उरल्स, ईएसपीओ आणि वरांडेय या विविध दर्जाच्या कच्च्या तेलाचा समावेश होता. या तेलाची किंमत लंडनच्या ‘डेटेड ब्रेंट’ या आंतरराष्ट्रीय मानक दरापेक्षा प्रति बॅरल 2 ते 8 डॉलर जास्त प्रीमियमवर देण्यात आली. याआधीच्या काही महिन्यांत रशियन तेल जागतिक दरांच्या तुलनेत सवलतीच्या दरात उपलब्ध होते.

पश्चिम आशियातील संघर्ष वाढत असल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी, जी आखाती तेल उत्पादक देशांना जागतिक बाजारपेठेशी जोडते, ती अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर प्रत्यक्षात बंदच झाली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

या परिस्थितीत हिंदुस्थानसारख्या मोठ्या आयातदार देशांना ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी तेल पुरवठा तातडीने सुरक्षित करावा लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.