
भारतात सर्वत्र डबकी, नाले व नद्यांचेही नाले झालेच आहेत. त्यामुळे गॅस व इंधनाचा तुटवडा भासणार नाही. मुंबईत ‘गॅस’ निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प मिठी नदीच्या तीरावर उभा करता येईल. या ‘गॅस’ निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात मुंबईच्या महापौरांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करायला हरकत नाही. तात्पर्य असे की, आखाती युद्धामुळे जगभरात इंधन व गॅस टंचाईच्या झळा बसल्या तरी मोदी यांच्या संशोधनामुळे भारतात नाल्यातून गॅस निर्मितीचे उद्दिष्ट गाठता येईल. जय नमो! नमो!!
आखाती युद्धाचा परिणाम भारतावर अजिबात होणार नसल्याचा दावा ‘मोदी’ सरकार वारंवार करीत होते. हा दावा सपशेल फोल ठरला आहे. जगात कच्च्या तेलाचे भाव वाढत असले तरी त्याचा देशांतर्गत महागाईवर फारसा परिणाम होणार नाही असे दोन दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले होते, पण तसे घडताना दिसत नाही. सगळ्यात आधी परंपरेनुसार आपला रुपया गडगडला आहे. अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 92.33 या नीचांकी पातळीवर रुपया गडगडला व त्याच वेळी भारताचा शेअर बाजारही कोसळला. इराण-इस्रायल युद्धात आखाती प्रांतांतील तेल विहिरी, तेलशुद्धीकरण कंपन्यांवर हल्ले झाले आहेत. कतार, बहारीन, कुवेतमधील तेल कारखाने संकटात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहक बोटींना इराणने रोखून ठेवले आहे. चीन, रशिया वगळता इतर सर्व देशांच्या तेलवाहक बोटी तेथेच फसल्या आहेत. भारताचे विश्वगुरू आपल्या बोटी अद्यापि बाहेर काढू शकलेले नाहीत. हे युद्ध सुरू झाल्यापासून मोदी भारतातच आहेत. या काळात त्यांची परदेशवारी झाली नाही याचे श्रेय भडकत्या युद्धाला आहे. युद्धात भारताची तशी काहीच भूमिका नाही. अमेरिकेच्या प्रे. ट्रम्प यांनी मोदी यांना मूक अभिनय करण्याची परवानगी दिली आहे. भारतातील सिनेमा हा मूकपटाकडून बोलपटाकडे गेला, पण मोदी व त्यांच्या सिने कंपनीचे उलटेच झाले. ते ‘बोलबच्चन’ पटाकडून मूकपटाकडे गेले व त्यांच्या या
अभिनयाचे कौतुक
अमेरिकेने केले आहे. ‘व्हाईट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, ‘‘प्रे. ट्रम्प आणि आमच्या अर्थमंत्र्यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची ‘परवानगी’ फक्त यासाठी दिली की, ते उत्तम ‘अॅक्टर’ म्हणजे अभिनयपटू आहेत. आम्ही जे सांगतो अगदी तसेच करतात.’’ ‘व्हाईट हाऊस’चे हे विधान भारताचा अपमान, निंदा करणारे आहे. पंतप्रधान मोदी हे कलाकार असून अमेरिकेच्या दिग्दर्शनाखाली ऑक्टिंग करतात. कोणत्याही पंतप्रधानांमुळे देशाचा असा अपमान झाला नव्हता. पंतप्रधान मोदी यांची छाती 56 इंचांची आहे, असे 2014 पासून ते छातीठोकपणे सांगत होते. या छातीचा पिंजरा प्रे. ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’च्या म्युझियममध्ये लटकवून ठेवलेला दिसतो. हा असा अपमान आणि पडझड सुरू असताना मोदी हे तामीळनाडू, केरळ, प. बंगालच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. म्हणजे ‘हॉलीवूड’मधून थेट ‘टॉलीवूड’च्या पडद्यावर आले. युद्धामुळे भारतातील परिस्थिती गंभीर होत आहे. व्यावसायिक गॅस, घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रासह भारतीय शेतकऱ्यांची उत्पादने ‘निर्यात’ संकटामुळे अडचणीत आली आहेत. दुबई, कुवेतच्या बंदरांवर भारतीय शेतकऱ्यांचा माल सडला आहे. वाहन उद्योग, औषध निर्माण करणाऱ्या उद्योगांवर संकटांचे ढग जमा झाले आहेत. महाराष्ट्राचेच बोलायचे तर ‘गॅस’ तुटवड्यामुळे
मुंबईसारख्या शहरांतील
चाळीस टक्के रेस्टॉरंट बंद पडली आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या रोजगारावर होत आहे. राज्यातील फाऊंड्री उद्योगास ‘गॅस’ची आवश्यकता असते. हजारावर फाऊंड्री उद्योग बंद पडताना दिसत आहेत. सरकारने गॅस टंचाईवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली. ही समिती नेमके काय करणार? गॅस टंचाईवर मार्ग शोधण्यासाठी या तीन सदस्यीय समितीला पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्याच संशोधनाची मदत घ्यावी लागेल. सध्याच्या ऊर्जा व गॅस संकटांवर मार्ग काढण्यासाठी मोदी यांनी आधीच संशोधन केले आहे. गॅसची टंचाई त्यामुळे भासणार नाही. नाल्यात पाइप टाकून गॅस निर्मिती करता येईल व घरच्या चुली पेटवता येतील. या नव्या प्रकल्पाचा शोध मोदींनी भारतात लावला आहे व त्यामुळे जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी पृथ्वीवर आता ‘नाले, गटारे व प्लॅस्टिक पाइप’ यांना महत्त्व प्राप्त होईल. त्यासाठी अनेक देशांना तेल विहिरींऐवजी नाले व गटारे यांची उभारणी करावी लागेल आणि या उपक्रमात भारत सगळ्यात पुढे राहील. भारतात सर्वत्र डबकी, नाले व नद्यांचेही नाले झालेच आहेत. त्यामुळे गॅस व इंधनाचा तुटवडा भासणार नाही. मुंबईत ‘गॅस’ निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प मिठी नदीच्या तीरावर उभा करता येईल. या ‘गॅस’ निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात मुंबईच्या महापौरांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करायला हरकत नाही. तात्पर्य असे की, आखाती युद्धामुळे जगभरात इंधन व गॅस टंचाईच्या झळा बसल्या तरी मोदी यांच्या संशोधनामुळे भारतात नाल्यातून गॅस निर्मितीचे उद्दिष्ट गाठता येईल. जय नमो! नमो!!































































