
इराण युद्धामुळे गॅस सिलिंडर कुठेही कमी पडणार नाहीत, आम्ही पूर्ण काळजी घेतलीय, हा मोदी सरकारचा दावा पुरता पोकळ ठरला आहे. अवघ्या दहा दिवसांत हिंदुस्थानात सिलिंडरसाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत. सिलिंडरसाठी हाणामाऱ्या आणि रडारड सुरू असून सारा देश हतबल झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे मोदी सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नोटबंदी आणि कोविडनंतर मोदींनी देशाला पुन्हा ‘रांगा’यला लावल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. सिलिंडरच मिळत नसल्याने घराघरांत चुली पेटल्या आहेत. ‘अरे सरकार सरकार, आता तवा चुलीवर’ म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. अनेक ठिकाणी कोळशावरील भट्टय़ा धगधगू लागल्या आहेत. त्यामुळे कोळशाची मागणी वाढली असून त्याचा भाव 32 रुपयांवरून थेट 40 वर पोहोचला आहे.
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने तेल व गॅसच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. तेलवाहू जहाजांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे तेल व गॅससाठी आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या हिंदुस्थानची कोंडी झाली आहे. त्यातच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचाही फटका बसला. इराणने चीन व रशियासाठी सामुद्रधुनी खुली करताना हिंदुस्थानला दिलासा दिला नाही. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान गॅसवर आहे.
गावदेवी येथील हिरोस हॉटेलमध्ये फक्त कोळसा शेगडीवरची बिर्याणीच मिळत आहे. या हॉटेलमध्ये एरवी 1100 पदार्थ मिळत होते. पण आता गॅस तुटवडय़ामुळे ते सर्व पदार्थ बंद करण्यात आले आहेत.
मोदींमुळे देशाला भोगावे लागतेय; काँग्रेसचा हल्ला
सरकारने नोटबंदी करून नागरिकांना रांगा लावायला भाग पाडले. कोविड काळात ऑक्सिजनसाठी रांगेत उभे केले. स्मशानातही रांगा लागल्या. आता एलपीजीसाठी लोक रांगा लावून उभे आहेत. आपल्याला तेल कधी आणि कुठून मिळणार हे अमेरिका ठरवतेय. मोदी यांच्यामुळे हे भोगावे लागतेय. ट्रम्प हे ‘एपस्टीन फाईल्स’मधील गुपितांची भीती दाखवून मोदींना घाबरवताहेत, असा आरोप काँग्रेसने केला.




























































