लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव नामंजूर; आवाजी मतदानाचा घेतला आधार, शहांच्या उत्तरावरून गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव आज आवाजी मतदानाने नामंजूर करण्यात आला. त्यामुळे ओम बिर्ला यांना पुन्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पक्षपाती भूमिका, विरोधी महिला खासदारांबद्दल निराधार वक्तव्य व विरोधी पक्षनेत्यांना देशहिताच्या मुद्दय़ावर बोलू न देण्याचा आरोप करत विरोधकांनी बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता. विरोधी बाकांवरील बहुतेक खासदारांनी त्यास पाठिंबा दिला होता. या प्रस्तावावर मंगळवारी व बुधवारी जोरदार चर्चा झाली. चर्चेदरम्यान विरोधी सदस्यांनी सभागृहात होत असलेल्या पक्षपाताचे दाखले देत ओम बिर्ला व सत्ताधाऱयांवर आसूड ओढले.

प्रियांका गांधी यांनी सुनावले!

अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या सभागृहातील उपस्थितीची आकडेवारी दिली. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शहांना सुनावले. ‘हा अविश्वास प्रस्ताव राहुल गांधी यांच्या विरोधात नव्हता, अध्यक्षांविरोधात होता. त्यावर बोलायला हवे होते. शहा सर्रास अपशब्द वापरतात. आजही त्यांनी सभागृहात अपशब्द वापरला, पण अध्यक्षांनी त्यांना अजिबात थांबवले नाही,’ याकडे प्रियांका यांनी लक्ष वेधले.

अमित शहा पुन्हा म्हणाले, साला…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चर्चेला उत्तर दिले. मात्र विरोधी सदस्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच टीकाटिप्पणी सुरू केली. त्यावेळी त्यांनी ‘साला’ हा शब्द वापरला. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला. शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणा दिल्या. त्याचवेळी पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी आवाजी मतदानाचा पुकारा केला आणि प्रस्ताव नामंजूर झाल्याचे जाहीर केले.